अकोला : पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तोंडावर आली असताना अकोल्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेयवाद पेटल्याचे चित्र दिसून येत आहे. अकोल्यातील सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना थेट पुरावे दाखवत सुपर स्पेशालिटीचे श्रेय आमचेच असल्याचा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी शनिवारी पत्रकार परिषेदत केला.
सुपरस्पेशालिटीची पायाभरणी ही काँग्रेस शासन काळातच झाली असून, त्याचे श्रेयदेखील आमचेच असल्याचा दावा करत काँग्रेसच्या केंद्र सरकारनेच ७ नोव्हेंबर २०१३ रोजी सुपरस्पेशालिटीसाठी १५० कोटी रुपये मंजूर केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. अकोल्यात सुपरस्पेशालिटी रुग्णालय व्हावे, अशी मागणी १५ ऑगस्ट २०१३ राेजी तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडे मी स्वत: केल्याचे डॉ. ढोणे यांनी सांगितले. त्यानंतरच तत्कालीन काँग्रेस सरकारने अकोल्यातील सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या स्थापनेसाठी १५० कोटी रुपये मंजूर केले होते. त्यावेळी केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे आघाडी सरकार हाेते. रुग्णालयाच्या मागणीपासून ते निधीला मंजुरी आणि मनुष्यबळाला मान्यता देण्यापर्यंतचे सर्वच कार्य हे काँग्रेसने केले. त्यामुळे सुपरस्पेशालिटीचे संपूर्ण श्रेय हे काँग्रेसचेच असल्याचा दावा करत डॉ. सुधीर ढोणे यांनी यावेळी केला. शासकीय विश्रामगृह येथे शनिवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अशोक अमानकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रशांत गावंडे यांची उपस्थिती होती.चर्चेसाठी खुले आवाहनसुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे श्रेय लाटणाऱ्यांनी आपल्या सत्ताकाळात काय केले हे सांगा? आम्ही काय केले आहे हे आम्ही पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवू. चर्चेसाठी काँग्रेसचे हे खुले आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रशांत गावंडे यांनी पत्रकार परिषदेत दिले.