अकोला : ‘मिशन दिलासा’ अंतर्गत जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त दोन कुटुंबांना चक्की व शेवळ्या मशीनचे वाटप मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. त्यामुळे संबंधित शेतकरी आत्महत्याग्रस्त दोन कुटंबांना मदतीचा आधार मिळाला आहे.अकोट तालुक्यातील केळीवेळी येथील शेतकरी रामदास वाघमारे यांनी गत १२ डिसेंबर २०१६ रोजी आत्महत्या केल्याची घटना घडली. तसेच बाळापूर तालुक्यातील कान्हेरी गवळी येथील शेतकरी भारत टकले यांनी गत आॅगस्ट २०१७ मध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यामुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त दोन शेतकरी कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. त्यानुषंगाने शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना रोजगाराचे साधन उपलब्ध करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन दिलासा’ अंतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त दोन कुटुंबांना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या हस्ते चक्की व शेवळ्या मशीनचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये केळीवेळी येथील शीला रामदास वाघमारे यांना चक्की (पीठगिरणी) व कान्हेरी गवळी येथील अर्चना भारत टकले यांना शेवळ्या तयार करण्याची मशीन देण्यात आली. यावेळी मनपा आयुक्त जितेंद्र वाघ उपस्थित होते. रोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यात आल्याने, शेतकरी आत्महत्याग्रस्त दोन कुटुंबांना मदतीचा आधार मिळाला आहे.