- आशिष गावंडे अकाेला - भाजपाच्या दबावतंत्रातून महापालिका प्रशासनाने शहरातील मालमत्तांचे पुनर्मुल्यांकन करणे व टॅक्स वसूलीसाठी खासगी एजन्सीला कंत्राट दिल्याचा आराेप शिवसेनेचे (ठाकरे गट) शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी शनिवारी आयाेजित पत्रकार परिषदेत केला. प्रशासनाच्या निर्णयामुळे अकाेलेकरांच्या खिशातून एजन्सीच्या घशात सुमारे ४० काेटी रुपये घातल्या जाणार आहेत. याविराेधात येत्या साेमवारपासून प्रभाग निहाय स्वाक्षरी माेहीम राबविणार असल्याची माहिती राजेश मिश्रा यांनी दिली.
महापालिकेने सन २०१६ मध्ये हद्दवाढ क्षेत्रासहित शहरातील मालमत्तांचे ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी खासगी एजन्सीची नियुक्ती केली हाेती. निकषानुसार मनपाने दर पाच वर्षांनंतर मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करणे क्रमप्राप्त आहे. २०२२ राेजी ही मुदत संपुष्टात आल्यामुळे प्रशासनाने पुनर्मूल्यांकनाचा निर्णय घेतला. तसेच मालमत्ता कर, पाणीपट्टी, बाजार वसुलीची जबाबदारीही खासगी एजन्सीकडेच साेपविण्याचा निर्णय घेत निविदा प्रक्रिया राबवली. निविदा प्रक्रियेत झारखंडमधील रांची येथील स्वाती इंडस्ट्रीज व स्पॅराे साॅफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत अर्ज प्राप्त झाले हाेते.
यापैकी स्वाती इंडस्ट्रीजने ८.३९ दराने सादर केलेली निविदा प्रशासनाने मंजूर केली. मनपाच्या मालमत्ता कर विभागातील कर वसूली लिपीक टॅक्सची रक्कम वसूल करण्यासाठी सक्षम आहेत. असे असताना खासगी एजन्सीकडे टॅक्स वसूलीची जबाबदारी केवळ भाजपच्या दबावापाेटी देण्यात आल्याचा आराेप शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी यावेळी केला. पत्रकार परिषदेला उपजिल्हाप्रम मंगेश काळे, मुकेश मुरुमकार,शहर प्रमुख राहुल कराळे, युवा सेना जिल्हाप्रमुख अभय खुमकर, शरद तुरकर, मनीष मोहड, गजानन बोराळे, संजय अग्रवाल आदी उपस्थित हाेते.
अकाेलेकरांवर पुन्हा टॅक्स वाढीचे संकटमालमत्तांचे पुनर्मुल्यांकन केल्यानंतर टॅक्सच्या रकमेत पुन्हा वाढ हाेणार असल्याची माहिती राजेश मिश्रा यांनी दिली. प्रशासनाच्या मनमानी कारभाराविराेधात टप्प्याटप्प्याने आंदाेलन छेडणार असून पहिल्या टप्प्यात प्रभाग निहाय स्वाक्षरी माेहीम राबवली जाणार असल्याची माहिती मिश्रा यांनी दिली.