अकोला: शाळा उघडण्यापूर्वी शिक्षकांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी जिल्ह्यातील शिक्षकांच्या चाचणीचे नियोजन करण्यात आले होते; मात्र चाचणीसाठी आलेल्या शिक्षकांकडूनच फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी महापालिकेच्या किसनीबाई भरतिया रुग्णालयात घडला. विद्यार्थ्यांची जबाबदारी असणाऱ्या शिक्षकांकडूनच असा प्रकार घडत असेल, तर शाळा सुरू होण्यापूर्वीच कोरोना फैलावाचा धोका नाकारता येत नाही. राज्य शासनाच्या निर्देशानुसार सोमवार, २३ नोव्हेंबरपासून इयत्ता ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्व शिक्षकांच्या कोविड चाचण्या करणे अनिवार्य करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने स्वॅब नमुने संकलनासाठी दहा केंद्रावर व्यवस्था करण्यात आली असून, गुरुवारी शिक्षकांना या केंद्रावर स्वॅब नमुने संकलनासाठी बोलावण्यात आले होते. त्यानुसार, शहरातील किसनीबाई भरतिया रुग्णालयात जवळपास ३०० ते ४०० शिक्षकांनी उपस्थिती लावली; मात्र या ठिकाणी नमुने संकलनासाठी वैद्यकीय चमू उशिरा आली. नमुने संकलनाचे कार्य सुरू होताच शिक्षकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत रांग लावली. यामध्ये एखादा पॉझिटिव्ह आल्यास इतरही शिक्षकांना कोरोनाचा धोका नाकारता येत नाही.
एक लाख ८,६५२ विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी शिक्षकांवर
जिल्ह्यात इयत्ता ९ वीचे २९ हजार ३७६, दहावीचे ३१ हजार ४१०, ११ वीचे २२ हजार ४६१, तर इयत्ता १२ वीचे २५ हजार ४०५,असे एकूण एक लाख ८,६५२ विद्यार्थी आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी शिक्षकांवर असणार आहे. अशा परिस्थितीत हा प्रकार विद्यार्थ्यांसाठीही धोकादायक ठरू शकतो.
चार दिवसांत सहा हजार जणांची चाचणी
जिल्ह्यात चार दिवसांत ४००२ शिक्षक, तर २००० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. यामध्ये अकोला तालुक्यातील अकोला तालुक्यातील शहरी भागातील १४५ शाळांच्या १२९४, तर ग्रामीण भागातील ७५ शाळांच्या ४७२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.