नितीन गव्हाळे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्य शासनाने २0१२-१३ मध्ये तासिका तत्त्वावर शिक्षक भरती करताना, जातीच्या संवर्गानुसार राखीव पदे भरण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे वरिष्ठ महाविद्यालयांना राखीव संवर्गातील तासिका तत्त्वावर शिक्षकच सापडत नसल्याचे चित्र आहे. शासनाच्या निर्णयाचा वरिष्ठ महाविद्यालयांसोबत कनिष्ठ महाविद्यालयांनाही फटका बसत असून, विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. शासनाने २0१२-१३ मध्ये ‘जीआर’ काढून तासिका तत्त्वावरची शिक्षक पदे भरताना ज्या संवर्गाकरिता पद राखीव आहे, त्याच संवर्गातील शिक्षकांची तासिका तत्त्वावरील पदावर भरती करण्याचा आदेश दिला. हा निर्णय सकारात्मक असला, तरी वरिष्ठ महाविद्यालयांमधील रिक्त असलेल्या विविध संवर्गातील राखीव पदांवर शिकविण्यासाठी तासिका तत्त्वावर शिक्षकच मिळत नसल्याने, शेकडो पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. यापूर्वी कमी खर्चामध्ये तासिका तत्त्वावर विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम शिक्षक करीत होते; परंतु आता राज्यातील विद्यापीठे शासन निर्णयाची अंमलबजावणी २0१७-१८ मध्ये करीत आहेत आणि विद्यापीठांनी ज्या संवर्गामधील पद राखीव आहे, त्याच संवर्गातील शिक्षकाची तासिका तत्त्वावर नियुक्ती करावी, असे म्हणत संवर्गानुसार राखीव पदावर शिक्षक नियुक्त न केल्यास त्यांना मान्यता मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. एकीकडे शासनाने पदे भरण्यास बंदी घातली आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात तासिका शिकविण्यासाठी तासिका तत्त्वावर शिक्षक मिळणेही दुरापास्त झाले आहे. एवढेच नाही, तर जिल्हा स्तरावरसुद्धा काही विषय शिकविण्यासाठी विविध संवर्गातील शिक्षक तासिका तत्त्वावर उपलब्ध होत नाहीत. त्यातही अल्प मानधन आणि संवर्गाची अट असल्यामुळे कोणताही शिक्षक तासिका तत्त्वावर शिकविण्यास तयार होत नसल्याचे वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये दिसून येत आहे. तासिका तत्त्वावरील पदे ही तात्पुरती असून, विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी ती एक व्यवस्था आहे. तेही शासन बंद करण्याच्या मार्गावर आहे. शासनाने संवर्ग न पाहता, तासिका तत्त्वावरील शिक्षकांची पदे भरण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी महाविद्यालये व विद्यार्थ्यांकडून होत आहे.
राखीव संवर्गातील पदे भरण्यास विरोध नाही; परंतु विविध संवर्गात पूर्णवेळ शिक्षकच मिळत नाही. तेथे संवर्गातील पदांवर तासिका तत्त्वावर शिक्षक कोठून मिळणार, असा प्रश्न आहे. तासिका तत्त्वावर शिक्षक नेमणे ही तात्पुरता व्यवस्था आहे. त्यामुळे शासनाने संवर्गाची अट काढून, शिक्षक नेमण्यास परवानगी द्यावी. - डॉ. सुभाष भडांगे, प्राचार्य,शिवाजी महाविद्यालय, अकोला.
तासिका तत्त्वावर शिक्षक भरताना आरक्षण हा नियम लावू नये. शासनाने आरक्षणानुसार पूर्णवेळ पदे भरण्याची परवानगी दिली, तर तासिका तत्त्वावरील रिक्त पदांचा प्रश्नच मिटतो. तासिका तत्त्वावर काम करण्यासाठी एसटी, व्हीजेएनटी संवर्गातील शिक्षकच मिळत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. - डॉ. आर.डी. सिकची, अध्यक्ष प्राचार्य फोरम.