ऑनलाइन लोकमतअकोला, दि. २२ : आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून युवकावर चार ते पाच आरोपींनी धारदार चाकूने हल्ला चढवून त्याच्यावर पाच ते सहा सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले. सर्वोपचार रूग्णालयात नेत असतानाच, त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी ५ वाजताच्या सुमारास गांधी रोड चौपाटीवर घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून, ईराणी झोपडवस्तीमध्ये राहणाऱ्या एका संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आकोट फैलनजिकच्या पाचमोरी परिसरात राहणारा जमीर अली नजरत अली(२४) हा मारेकरी युवकांसोबत गांधी रोडवरील चौपाटीवर आला होता. चौपाटीवर सरिता नामक हॉटेलमध्ये ते चर्चा करण्यासाठी बसले होते. आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून जमीर अली व मारेकऱ्यांमध्ये वाद झाले. वाद विकोपाला गेल्यामुळे जमीर अली हा हॉटेलमधून बाहेर पडला आणि दीपिका आईस्क्रीम पार्लरसमोर आला असता, तेवढ्यात त्याच्या मागाहून चार ते पाच आरोपी आले आणि त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला चढविला.
मारेकऱ्यांनी त्याच्या मानेवर व छातीवर सपासप वार केले. जमीर अली हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर आरोपींनी तेथून पळ काढला. अचानक घडलेल्या घटनेमुळे गजबजलेल्या चौपाटीवर एकच धावपळ उडाली. खाद्यपदार्थ खाण्यासाठी आलेल्या महिला, लहान मुले आणि परिसरातील दुकानदार घटनेमुळे भयभित झाले. काही दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली. परिसरातील काही दुकानदार युवकांनी जखमी जमीर अली याला आटोरिक्षामध्ये सर्वोपचार रूग्णालयात नेले. परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला. एका तासानंतर त्याची ओळख पटली.