अकोला : मरण पावलेल्या वृद्धेच्या जागेवर एका महिलेला उभे करून बनावट कागदपत्रांच्या आधारे मृत वृद्धेची शेती हडपण्याचा प्रकार तेल्हारा तालुक्यातील घडला. एका शेतकऱ्याच्या मृत आजीच्या जागेवर एका महिलेला उभे करून बनावट कागदपत्रे तयार करण्यास सहकार्य केल्याबद्दल तेल्हारा येथील दुय्यम निबंधक जी. जी. पावडे यांच्यासह मुद्रांक विक्रेता आणि एकाच कुटुंबातील चार जणांविरुद्ध हिवरखेड पोलिसांनी तेल्हारा न्यायालयाच्या आदेशानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
संग्रामपूर तालुक्यातील वरवट येथील सुरेश मधुकर खाळपे (३०) यांच्या तक्रारीनुसार त्यांची आजी शांताबाई जयराम खाळपे यांना त्यांच्या वडिलांकडून मौजे वारी भैरवगड शिवारात गट नंबर ५८ व क्षेत्र ४ हे ९९ आरपैकी ४ हेक्टर ३० आर शेती मिळाली होती. ही शेती सुरेश खाळपे यांच्या ताब्यात व वहीत आहे. त्यांची आजीचे ऑक्टोबर २०१९ मध्ये निधन झाले. मात्र त्यांची आजी ही खरेदी खताच्या वेळी जिवंत असतानाही आजीच्या जागेवर आरोपी महिला सुनंदा केशव म्हसाये हिला उभे करून संदीप म्हसाये याच्या नावाने १ हेक्टर २१ आर व आरोपी प्रभुदास म्हसाये याच्या नावाने १ हेक्टर २८ आर असे खोटे व बनावट खरेदीखत नोंदविले होते.
आरोपी केशव म्हसाये हा त्या शेतीमध्ये वारस लागल्याने व त्या शेतीच्या खरेदी खतामध्ये केशव म्हसाये हा साक्षीदार त्याने शेती हडपली. मुद्रांक विक्रेता ब्रह्मदेव नारायण वानखडे (रा. अडगाव) याला शांताबाई जयराम खाळपे ही वृद्धा मरण पावल्याचे माहीत असूनही त्याने मुद्रांक दिले आणि आरोपी दुय्यम निबंधक जी. जी. पावडे यांनाही शांताबाई ही मृत असून, तिच्या जागेवर सुनंदा म्हसाये हिला उभे करण्यात आल्याचे माहीत असूनही त्यांनी आरोपींची संगनमत करून ही शेती आरोपी संदीप केशव म्हसाये याच्या नावे रजिस्टर खरेदी खताने नोंदवून देत, सुरेश खाळपे यांची शेती हडप केली. याबाबत तक्रारदाराने आरोपींविरुद्ध पोलिसांसह शासनाच्या महसूल मंत्र्यांकडे तक्रार केली होती. परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे तक्रारदाराने न्यायालयात तक्रार दाखल केली. यामध्ये न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याचे हिवरखेड पोलिसांना आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.