अकोला: दिंडी, भगवे ध्वज, अश्व आणि वाजतगाजत, फटाक्यांच्या आतषबाजीत राजराजेश्वर नगरीतून निघालेल्या भव्य शोभायात्रेत जय जय श्रीरामच्या जयघोषाने आसमंत निनादून गेला होता. ढोल-ताशांचा गजर, टाळ मृदंगाचा नाद, रस्त्यांवर रंगीबेरंगी रांगोळी आणि हजारोंच्या कंठातून निनादत असलेल्या जय श्रीरामच्या जयघोषाने राजराजेश्वर नगरी १७ एप्रिल रोजी रोजी राममय होऊन न्हाऊन निघाली. श्रीराम नवमी शोभायात्रा उत्सव समिती व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सायंकाळी राजराजेश्वर मंदिरातून ढोल-ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली.
प्रारंभी ग्रामदैवत राजराजेश्वर मंदिरात सर्वसेवाधिकारी कृष्णा गोवर्धन शर्मा, श्रीराम नवमी शोभायात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष शैलेष खरोटे, भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय पाटील, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार हरीश पिंपळे, विजय अग्रवाल, माजी गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, रा. स्व. संघाचे विभाग संघचालक प्रा. नरेंद्र देशपांडे, गणेश काळकर, राहुल राठी, राजेश मिश्रा, गिरीश जोशी भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, जयंत मसने, वसंत बाछुका आदींच्या उपस्थितीत महाआरती करून राजराजेश्वर मंदिरातून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. आकर्षक चित्ररथांनी वेधले लक्षशोभायात्रेमध्ये हजारो रामभक्तांसह विविध सामाजिक, धार्मिक संस्थांचे संदेश देणारे चित्ररथ सहभागी झाले होते. शोभायात्रेत थोर पुरुषांची आकर्षक वेशभूषा केलेली घोड्यांवरील चिमुकली मुले, मुली लक्ष वेधून घेत होते. शोभायात्रेत सहभागी रामभक्तांच्या गळ्यामध्ये केशरी दुपट्ट्यांनी वातावरण भगवेमय करून टाकले होते. शोभायात्रेच्या अग्रस्थानी अश्व, भजनी मंडळ आणि राम दरबाराची पालखी होती.