अकोला : कोरोनामुळे संचारबंदीत बाहेर पडणे कठीण असताना सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांना काही औषधी, पीओपी बॅन्डेज खासगीतून खरेदी करण्याचा सल्ला दिला जात आहे. कोरोनाच्या संकटातही ‘जीएमसी’मध्ये अत्यावश्यक वैद्यकीय साधनांचा तुटवडा असल्याने त्याचा फटका रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना बसत आहे.कोरोनाच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र संचारबंदी लावण्यात आल्याने सर्वोपचार रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या घटली आहे; परंतु अत्यावश्यक असेल तर रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात यावेच लागते. यामध्ये प्रामुख्याने अपघातात जखमी झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. अपघात कक्षात हे रुग्ण दाखल झाल्यावर त्यांच्यावर प्रथमोपचार होतो; मात्र रुग्णाचे हाड मोडले असेल, तर प्लास्टरसाठी आवश्यक पीओपी बॅन्डेज या ठिकाणी उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यासह इतर आवश्यक वैद्यकीय साधनांचाही तुटवडा असल्याने डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून रुग्णांच्या नातेवाइकांना हे साहित्य बाहेरून खरेदी करण्यास सांगण्यात येत आहे. संचारबंदी असल्याने बाहेर पडणे कठीण असताना औषध आणि इतर वैद्यकीय साहित्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेर पडावे लागत आहे. जवळपासच्या औषध दुकानांमध्ये ते उपलब्ध नसल्यास रुग्णांच्या नातेवाइकांची चांगलीच पंचाईत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सर्वोपचार रुग्णालयात ‘पीओपी बॅन्डेज’च नाहीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 4:55 PM