लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जनऔषध वैद्यकशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापिकेने सोमवारी त्याच विभागाच्या प्रमुखाविरुद्ध थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर गत अनेक दिवसांपासून अंतर्गत असलेला या दोन प्राध्यापकांमधील वाद चव्हाट्यावर आला. सदर प्राध्यापिकेने याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याकडेही तक्रार केल्याने या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.जनऔषधवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अरुण हुमणे हे आपल्याला व आपल्या पतीला मानसिक त्रास देत असल्याची लेखी तक्रार सहयोगी प्राध्यापिका डॉ. कल्पना काळे (अस्वार) यांनी सोमवार, २२ जुलै रोजी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे, की डॉ. हुमने हे विनाकारण कोणत्या ना कोणत्या कारणाने मानसिक त्रास देत आहेत. याबाबत आपण अधिष्ठातांकडेही तक्रार केली आहे. तसेच ७ नोव्हेंबर २0१७ रोजी झालेल्या मानसिक छळाबद्दल आपण वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्याकडेही तक्रार केल्याचे डॉ. काळे यांनी या तक्रारीत म्हटले आहे. डॉ. हुमने हे आपल्यावर वैयक्तिक टीका करीत असून, ते कनिष्ठ प्राध्यापकांना आपल्याविरुद्ध भडकावत असल्याचा आरोपही डॉ. काळे यांनी या तक्रारीत केला आहे. या प्रकारामुळे आपण प्रचंड तणावाखाली असून, आपले दैनंदिन जीवन विस्कळीत झाल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, या संदर्भात डॉ. हुमने यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
आरोपांच्या चौकशीसाठी समिती गठितडॉ. हुमने व डॉ. काळे यांच्यात गत अनेक दिवसांपासून वाद सुरू असून, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी या दोघांमधील वाद सामोपचाराने सोडविण्याचा प्रयत्न केला; परंतु यामध्ये यश आले नाही. त्यामुळे त्यांनी डॉ. काळे यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी उप अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. सदर समितीचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे.
वाद सामोपचाराने मिटविण्याचा प्रयत्नदोन वरिष्ठ प्राध्यापकांमधील हा अंतर्गत वाद असल्याने तो सामोपचाराने मिटविण्याचा प्रयत्न वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दोघांनाही अधिष्ठातांच्या कक्षात समोरा-समोर बसवून चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दोघांचाही वाद सामंजस्याने मिटविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सांगितले.