लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमधील जागा वाटपावर अंतिम चर्चा झाली असून, अकोल्यातील पाच मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघ राष्टÑवादीला देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. २००९ च्या निवडणुकीमध्ये आघाडी कायम असताना राष्ट्रवादीला अवघ्या एका मतदारसंघावर समाधान मानावे लागले होते; मात्र आता राष्ट्रवादीने आणखी एक मतदारसंघ मिळवून काँग्रेसला बॅकफुटवर टाकले असल्याची चर्चा आहे.अकोल्यातील अकोट, बाळापूर व अकोला पूर्व हे मतदारसंघ काँग्रेसने आपल्याकडे कायम ठेवले असून राष्ट्रवादीला मूर्तिजापूरसह अकोला पश्चिम हा सर्वाधिक चर्चेचा मतदारसंघ देण्यात आल्याची माहिती आहे. या जागा वाटपात बदल होऊन अकोला पश्चिम हा मतदारसंघ पूर्ववत काँग्रेसला मिळेल, अशा आशेवर असलेल्या इच्छुकांना जागा वाटपाच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.अकोट व अकोला पूर्व या दोन मतदारसंघांवर राष्ट्रवादीचा प्रबळ दावाच नव्हता. तसेच मूर्तिजापूर मतदारसंघाबाबतही काँग्रेस आग्रही नव्हती. त्यामुळे चर्चेच्या पहिल्या १२५ मतदारसंघामध्ये या तीन मतदारसंघांबाबत कोणताही वाद झाला नसल्याने जागा वाटपाच्या निकषावर हे मतदारसंघ निकालात काढण्यात आले. बाळापूर व अकोला पश्चिम या दोन मतदारसंघांत मात्र दोन्ही काँग्रेसकडून उमेदवारीची प्रचंड स्पर्धा होती. बाळापूर मतदारसंघातून राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे हे स्वत:च इच्छुक असल्याने ही जागा त्यांनी प्रतिष्ठेची केली होती, तर काँग्रेस या जागेवर आपला दावा सोडण्यास तयार नव्हती. दुसरीकडे अकोला पश्चिममध्ये गत निवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिल्याने पक्षाला येथे विजयापर्यंत पोहोचण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने या जागेवरील दावा सोडलाच नव्हता व ही जागा आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळाल्याची माहिती आहे.
अकोला पश्चिमची मागणी काँग्रेसने रेटली नसल्याची चर्चा!अकोला पश्चिम मतदारसंघासाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची मोठी संख्या आहे. मुस्लीमबहुल असलेल्या या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचे मताधिक्य हे गत निवडणुकीपेक्षा अधिक होते. त्यामुळे अनेक इच्छुकांना या मतदारसंघात उमेदवारीचे डोहाळे लागले होते. जागा वाटपाच्या चर्चेत या मतदारसंघाबाबत काँग्रेस प्रचंड आग्रही राहील, असाच दावा इच्छुकांकडून केला जात होता.प्रत्यक्षात मात्र जागा वाटपाच्या चर्चेत काँग्रेसने आपला दावा प्रभावीपणे रेटला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे हा मतदारसंघ राष्टÑवादीला देण्यात आल्याचे समजते. या मतदारसंघासाठी काँग्रेसमधून तब्बल १६ इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १४ इच्छुकांनी अकोल्यात मुलाखती दिल्या होत्या.प्रबळ दावेदार उमेदवारीसाठी आशावादीअकोला पूर्व, बाळापूर व अकोट या तीन मतदारसंघांत उमेदवारी कोणाला, याची घोषणा येत्या आठवड्यात होण्याची चिन्हे आहेत. अकोटमध्ये महेश गणगणे, संजय बोडखे व डॉ. संजीवनी बिहाडे यांच्यामध्ये प्रमुख स्पर्धा आहे तर बाळापुरात ऐनोद्दीन खतीब, डॉ. सुधीर ढोणे, प्रकाश तायडे यांच्यासह डॉ. अभय पाटील यांचेही नाव चर्चेत आहे.अकोला पूर्वसाठी काँग्रेसकडून विवेक पारसकर, दादा मते पाटील व अजाबराव टाले या इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत, त्यामुळे हे सर्व दावेदार उमेदवारीसाठी आशावादी आहेत.
अकोला पूर्वमध्ये पारसकरांची चर्चाअकोला पूर्व या मतदारसंघात येथील उद्योजक विवेक पारसकर यांनी सुरू केलेला जनसंपर्क व ग्रीन ब्रिगेडच्या माध्यमातून हाती घेतलेले विविध कार्यक्रम पाहता त्यांची उमेदवारी पक्की मानल्याची चर्चा आहे. विकासाच्या नावावर होत असलेली दिशाभूल, प्रत्यक्षातील विकासाचे फसवे चित्र व रोजगारांच्या संधींचा अभाव या प्रमुख मुद्यांवर सध्या त्यांचा प्रचार सुरू असल्याने त्यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारीचे संकेत पक्षश्रेष्ठींकडून मिळाल्याचा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत.