लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सांगळूद बुद्रूक येथील एकाच कुटुंबातील तिघांना घरकुलाचा लाभ देताना शासनाचे निकष, नियम धाब्यावर बसविण्यात आले. त्यातून शासनाची फसवणूक करण्यात आली. ती रक्कम लाभार्थींसह ग्रामपंचायत सरपंच, सचिव, देयक अदा करणार्या यंत्रणेकडून वसूल करण्याची मागणी अमोल सिरसाट यांनी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांना मंगळवारी दुसर्यांदा दिलेल्या तक्रारीत केली. सांगळूद ग्रामपंचायतचे सरपंच अमोल येले यांच्यासह सचिवांनी १५ ऑगस्ट २0१६ रोजीच्या ग्रामसभेत रमाई आवास योजनेसाठी प्रदीप मुरलीधर पळसपगार यांची निवड निकष डावलून केली. प्रत्यक्षात त्यांच्याकडे जिल्हा परिषद बांधकाम विभागात १५ लाख रुपये र्मयादेत कामे करण्याच्या कंत्राटदार परवान्याची नोंद आहे. त्याच सभेत संदीप मुरलीधर पळसपगार यांचीही निवड केली. त्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे. त्याच सभेत इंदूबाई मुरलीधर पळसपगार यांचीही निवड केली. एकाच घरातील तिघांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी पात्र नसतानाही एकाच सभेत निवड केली. याप्रकरणी लाभार्थींसह शासनाची फसवणूक करणार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, बेकायदेशीरपणे अनुदान वितरित करणार्यांकडून वसुलीची कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत अमोल सिरसाट यांनी केली.
आधीच्या तक्रारीतील कागदपत्रे गहाळपात्र नसतानाही घरकुलाचा लाभ घेतल्याची तक्रार पालकमंत्री डॉ. पाटील यांच्या जनता दरबारात आधीही करण्यात आली. त्या तक्रारीसोबत पुरावेही जोडण्यात आले; मात्र कोणतीच कारवाई न झाल्याने मंगळवार, २६ डिसेंबर रोजी पुन्हा तक्रार दिल्यानंतर आधीच्या तक्रारीतील पुरावे गहाळ असल्याचे पुढे आले. त्यामुळे मंगळवारी पुन्हा पुराव्यासह तक्रार दिली.