- अतुल जयस्वाल
अकोला - वाशिम मार्गावरील नवीन हिंगणा परिसरातील एका काचेच्या कारखान्याजवळ शुक्रवारी दोघांवर हल्ला करून पसार झालेला बिबट गत दोन दिवसांपासून त्याच परिसरात वावरत असल्याची माहिती आहे. परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. पसार झालेल्या या बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाने अधिकारी व कर्मचाऱ्यांची तीन पथके तयार केली असली तरी बिबट्याला जेरबंद करण्यात यश येत नसल्याचे वास्तव आहे.
बिबट्याने हिंगना परिसरात शुक्रवारी एका मजुरावर हल्ला केला होता. यावेळी आणखी एका तरुणालाही जखमी केले होते. हल्ला केल्यानंतर हा बिबट त्याच परिसरातील झुडपांमध्ये पसार झाला. बिबट्याबाबत माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याच दिवशी हा परिसर पिंजून काढला. परंतु, बिबट्याचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही. अकोला वनविभागाच्या मदतीला बुलढाणा येथूनही चमू बोलावण्यात आली आहे. २५ ते ३० अधिकारी व कर्मचारी मिळून तीन पथके तयार करण्यात आली असून, ही पथके शुक्रवारपासूनच बिबट्याचा शोध घेत आहेत. तसेच गीतानगर, गंगानगर, सालासर बालाजी मंदिर परिसर, लोणी बारलिंगा परिसर, ठोक भाजीपाला मार्केट आदी परिसराचे ड्रोनद्वारे सर्वेक्षणही करण्यात आले. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन वनविभागकडून करण्यात आले आहे.
नागरिकांमध्ये दहशतशुक्रवारी हिंगणा परिसरात आढळलेल्या बिबट्याला पकडण्यात अजुनही यश आले नाही. अशातच शनिवारी गंगानगर परिसरात एका व्यक्तीला बिबट दिसल्याची माहिती आहे. कळंबेश्वर परिसरातही बिबट्याचे पदचिन्ह दिसल्याची वार्ता पसरल्यानंतर या परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. सकाळी व सायंकाळी फिरावयास जाणाऱे गत दोन दिवसांपासून घरातच राहणे पसंत करत आहेत.