आशिष गावंडे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानांतर्गत महापालिका क्षेत्रात बांधण्यात आलेली सार्वजनिक स्वच्छतागृहे, वैयक्तिक शौचालये केंद्र सरकारच्या रडारवर आली आहेत. शौचालयांच्या उभारणीसाठी केंद्र व राज्य शासनाने प्रत्येकी सहा हजार रुपये, असे प्रति लाभार्थी एकूण १२ हजार रुपये अनुदान देण्यात आले होते. मनपा क्षेत्रात आतापर्यंत १८ हजार १३७ शौचालयांची उभारणी करण्यात आली असून, त्यांचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करण्याचा निर्णय केंद्र व राज्य शासनाने घेतला आहे. त्या पृष्ठभूमीवर शनिवार, २३ डिसेंबर रोजी केंद्र शासनाची चमू अकोल्यात दाखल होणार असल्याची माहिती आहे. केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानच्या धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात आले. २ ऑक्टोबर २0१७ पर्यंत राज्यातील शहरांना हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले होते. त्यानुषंगाने महापालिका, नगर परिषद व नगरपंचायतींमध्ये सार्वजनिक शौचालयांसह वैयक्तिक शौचालयांचे मोठय़ा प्रमाणात बांधकाम करण्यात आले. वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठी पात्र लाभार्थीला केंद्र शासनाकडून सहा हजार रुपये व राज्य शासनाकडून सहा हजार, असे एकूण १२ हजारांचे अनुदान देण्यात आले. १२ हजार रुपयांमध्ये दज्रेदार वैयक्तिक शौचालय उभारणे लाभार्थींना शक्य नसल्यामुळे अकोला महापालिकेच्या तत्कालीन महापौर उज्ज्वला देशमुख यांनी मनपा निधीतून तीन हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे १५ हजार रुपयांत मनपा क्षेत्रात १८ हजार १३७ वैयक्तिक शौचालयांची उभारणी करण्यात आली. यासाठी २९ कोटी २५ लक्ष ५५ हजार रुपये निधी खर्च झाला. शहराला हगणदरीमुक्त करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात शौचालयांची उभारणी केली असली, तरी त्यांचा दर्जा राखला गेला की नाही, यावर केंद्र व राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने निरीक्षण नोंदविल्याची माहिती आहे. त्या पृष्ठभूमीवर शौचालयांचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करण्यासह बांधकामाची तपासणी करण्यासाठी केंद्र शासनाची द्विसदस्यीय चमू शनिवार, २३ डिसेंबर रोजी अकोला शहरात दाखल होत आहे.
एक महिन्यांपासून ‘गुड मॉर्निंग’ पथके बंदशहरात वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम केल्यानंतरही काही नागरिक उघड्यावर शौचास बसत असल्याचे निदर्शनास येताच महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी झोन अधिकारी, आरोग्य निरीक्षक व महिला बचत गटांची ‘गुड मॉर्निंग’ पथके कार्यान्वित केली होती. रेल्वे रुळालगत, नदीकाठी तसेच झोपडपट्टी भागात पहाटे ५ वाजतापासून पथकांच्या माध्यमातून नागरिकांना उघड्यावर शौच करण्यास मज्जाव करण्यासह जनजागृती करण्याची मोहीम सुरू केली होती. अजय लहाने यांची बदली होताच मनपाची ‘गुड मॉर्निंग’ पथके बंद झाली, हे येथे उल्लेखनीय. सार्वजनिक शौचालयांचीसुद्धा दुरवस्था झाली आहे.