संजय खांडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : डब्बा ट्रेडिंगच्या सट्टाबाजारातील आर्थिक फटक्यात अकोल्यातील एका नामवंत ट्रान्सपोर्टचे संचालक आणि असोसिएशनचे पदाधिकारी यांनी सात कोटींची रक्कम थकविली आहे. बँकांचे तीन कोटी आणि हुंडीचिठ्ठीची चार कोटी एवढी रक्कम अचानक थांबविल्याने अकोला बाजारपेठ हादरली आहे. औद्योगिक वसाहतीमधील चार दालमिल संचालकांनी कोट्यवधींची रक्कम थांबविल्यानंतर आता ट्रान्सपोर्ट संचालकही या रांगेत आले आहेत. एका ट्रेडिंग कंपनीचे संचालक, अकोल्यातील ट्रान्सपोर्ट विभागातील नामांकित व्यक्ती यांनी अकोल्यातील काही बँकांकडून तीन कोटी रुपयांचे कर्ज घेतले. सोबतच हुंडीचिठ्ठी बाजारातूनही चार कोटी रुपये व्याजाने उचललेत. या रकमेचा विनियोग व्यापारात लावण्याऐवजी या व्यक्तीने ही रक्कम डब्बा ट्रेडिंगमध्ये गमाविली. बाजारपेठेतील मंदीचा जबर फटका या ट्रान्सपोर्ट संचालकास बसला. त्यामुळे त्यांनी अकोला बाजारपेठेतील हुंडीचिठ्ठी दलालांची रक्कम थांबविली आहे. तीन प्रमुख बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्तेही बंद झाल्याने बँकांनीदेखील रक्कम वसुलीसाठी आता मोहीम सुरू केली आहे. अकोलाच्या औद्योगिक वसाहतीमधील चार दालमिल संचालकांनी अकरा कोटींची हुंडीचिठ्ठीची रक्कम थांबविल्या पाठोपाठ ट्रान्सपोर्ट संचालकाने सात कोटी थांबविल्याने अकोल्यातील इतर बाजारपेठेवरही त्याचा परिणाम जाणवत आहे.
हुंडीचिठ्ठी दलाल सतर्कमोठमोठय़ा फर्मच्या नावाने कधीकाळी काहीही चौकशी न करता कोट्यवधींची रक्कम दिली जायची. हुंडीचिठ्ठी दलालांजवळ व्यापारी फर्मची प्रतिष्ठा होती; मात्र अलीकडच्या काळात अनेक नामवंत फर्मने दिवाळे काढलेत. त्यामुळे अकोल्यातील हुंडीचिठ्ठी दलाल सतर्क झाले आहेत. रक्कम देताना आता फर्मच्या आर्थिक व्यवहाराची चाचपणी केली जात आहे.