लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना संकटाच्या पृष्ठभूमीवर शासनाने कामगारांना मदतीचा हात दिला आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांनी मंडळात नोंदीत जीवित (सक्रिय) बांधकाम कामगारांना २००० रुपये अर्थसाहाय्य देण्याचे घोषित केले होते. त्यानुसार जिल्ह्यात ९ हजार ८०३ कामगारांच्या खात्यात दोन हजाराची रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती कामगार आयुक्तांनी दिली आहे.जिल्ह्यात २५,७७६ नोंदीत कामगार असून, मार्च २०२० अखेर जीवित नोंदीत कामगारांची संख्या ११,१९६ आहे. हे सर्व कामगार सदर योजनेकरिता पात्र ठरले. मंडळाने या पात्र कामगारांची यादी जिल्हा कार्यालयाकडून घेऊन सदर कामगारांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी २००० रुपये डीबीटीद्वारे वर्ग करण्याची कार्यवाही २० एप्रिल २०२० पासून सुरू केली. आतापर्यंत ९,८०३ बांधकाम कामगारांच्या खात्यामध्ये अर्थसाहाय्याची रक्कम जमा झाल्याचे मंडळाने कळविले आहे.बांधकाम कामगार हे मोठ्या प्रमाणात कामासाठी स्थलांतर करतात. काम संपल्यानंतर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतर करतात. तसेच २०११ पासून ज्यांनी योजनांचा लाभ घेतला, ते सर्वच बांधकाम कामगार दरवर्षी नूतनीकरण करीत नाहीत, बरेच कामगार एकदा नोंदणी झाली की नूतनीकरण करीत नाहीत. तसेच ते एका व्यवसायात राहत नाहीत. नोव्हेंबर, डिसेंबर २०१८ मध्ये मोठ्या प्रमाणात अभियान राबवून ६,५०० कामगारांची नोंदणी करण्यात आली; परंतु त्यापैकी बहुतांश कामगारांनी नूतनीकरण केलेले नाही. ज्या बांधकाम कामगारांचे नूतनीकरण बाकी आहे, अशा बांधकाम कामगारांनी आॅनलाइन आवश्यक कागदपत्रे अपलोड करून नूतनीकरण करावे, जेणेकरून मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ बांधकाम कामगारांना मिळणे शक्य होईल, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त, रा. दे. गुल्हाने यांनी केले आहे.उर्वरित कामगारांच्या बँक खात्यामध्ये अर्थसाहाय्याची रक्कम वर्ग करण्याची कार्यवाही मंडळ स्तरावर सुरू असून, कोरोनाच्या पृष्ठभूमीवर मजुरांना दिलासा देण्यास प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे.-रा. दे. गुल्हाने, सहायक कामगार आयुक्त, अकोला.
अकोला : ९ हजार ८०० कामगारांच्या खात्यात दोन हजाराची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 10:07 AM