अकोला : कोरोनाच्या अनियंत्रित वाढीला थांबविण्यासाठी संपर्काची साखळी खंडीत करण्याच्या उद्देशाने गत तीन दिवस अकोल्यात लागू असलेला सक्तीचा ‘लॉकडाऊन’ मंगळवारी शिथिल करण्यात आला. लॉकडाऊन संपताच अकोलेकरांनी पुन्हा रस्त्यांवर गर्दी केली असून, शहरासह जिल्ह्यात सर्वच भागातील बाजारपेठा गजबजून गेल्याचे चित्र मंगळवारी सकाळपासूनच पहावयास मिळाले. तथापि, अकोट व तेल्हारा तालुक्यांमध्ये आणखी दोन दिवस लॉकडाऊन राहणार असल्याने या दोन तालुक्यांमध्ये बाजारपेठा बंद असून, रस्त्यांवर शुकशुकाट आहे.अकोल्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून, पश्चिम विदर्भातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचा जिल्हा अशी ओळख निर्माण झाली आहे. जिल्ह्यात तब्बल २१८४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, आतापर्यंत १०५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा हा वाढता संसर्ग थोपविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शनिवार १८ जुलै ते सोमवार २० जुलै या कालावधीत तीन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केला. शुक्रवारी सायंकाळपासूनच लागू झालेल्या लॉकडाऊनला अकोलेकरांना उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला. संपूर्ण जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. वैद्यकीय सेवा व औषधांची दुकाने वगळता अकोला शहर व जिल्ह्यातील तालुक्याची शहरे तसेच मोठ्या गावांमधील बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश असल्यामुळे लॉकडाऊन शंभर टक्के यशस्वी झाला. तीन दिवस शहरातील रस्ते व बाजारपेठा ओस पडल्या होत्या. मंगळवारी लॉकडाऊन शिथिल होताच बाजारपेठांमधील दुकाने सम-विषमच्या नियमाप्रमाणे उघडण्यात आली. भाजीपाला व इतर किरकोळ वस्तुंची दुकाने खुली झाल्याने नागरिकांची मोठी गर्दी या दुकानांमध्ये पहावयास मिळाली. अकोला शहरातील महात्मा गांधी मार्ग, टिळक मार्ग, मोहम्मद अली मार्ग या मार्गांवर नागरिकांची प्रचंड गर्दी झाली आहे. तीन दिवसांपासून घरातच असलेले नागरिक रस्त्यांवर उतरल्यामुळे संपूर्ण शहरच गजबजून गेल्याचे चित्र आहे.सम-विषमचा नियम कायमचतीन दिवसांचा लॉकडाऊन शिथिल झाला असला, तरी यापूर्वीचे लॉकडाऊनचे नियम कायमच आहेत. पूर्वीप्रमाणेच सम-विषम नियमानुसार रस्त्याच्या एका बाजुची दुकाने उघडण्यात आली. तसेच सायंकाळी सात वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याचाही नियम अंमलात राहणार आहे.अकोट-तेल्हारा कडकडीत बंदअकोला शहराच्या तुलनेत अकोट आणि तेल्हारा या दोन तालुक्यामध्ये कोरोनाचा उद्रेक वाढला असल्याने येथील लॉकडाऊन २२ जुलैपर्यंत वाढविण्यात आल्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे मंगळवारीही या दोन्ही तालुक्यांमध्ये कडकडीत बंद पाळला जात असल्याचे दिसून आले.
अकोला अनलॉक : पुन्हा सारे रस्त्यावर; बाजारपेठा गजबजल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:18 PM
अकोला शहरासह जिल्ह्यात सर्वच भागातील बाजारपेठा गजबजून गेल्याचे चित्र मंगळवारी सकाळपासूनच पहावयास मिळाले.
ठळक मुद्देमार्गांवर नागरिकांची प्रचंड गर्दी झाली आहे.नागरिकांची मोठी गर्दी या दुकानांमध्ये पहावयास मिळाली.संपूर्ण शहरच गजबजून गेल्याचे चित्र आहे.