अकाेला : काेराेना प्रतिबंधासाठी लागू केलेले कडक निर्बंध साेमवारपासून शिथिल झाले. त्यामुळे या अनलाॅकच्या पहिल्याच दिवशी अकाेल्याच्या बाजारपेठेत चैतन्य परतल्याचे दिसून आले. बाजारपेठेतील प्रत्येक रस्ता हा गर्दीने फुलून गेला हाेता. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांची कोंडीदेखील झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नागरिकांनी कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडविल्याचे दिसून आले.
लाॅकडाऊन हे कुणालाच परवडणारे नाही; मात्र कोरोनाचा वारंवार होणारा उद्रेक जिल्ह्याला लॉकडाऊनकडे ढकलतो. त्यामुळे लाॅकडाऊन हा पर्याय टाळायचा असेल तर नियम पाळणे आवश्यक ठरते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्येचा मोठा विस्फोट झाला. वाढत्या रुग्णसंख्येबरोबर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची भयावह संख्या समोर आली. त्यामुळे ब्रेक द चेन अंतर्गत १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू करण्यात आली हाेती. या नियमांची सक्त अंमलबजावणी केल्याने अकाेल्याचे अर्थचक्र ठप्प झाले हाेते. साेमवारपासून जिल्ह्यात दुपारी चारपर्यंत अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक व्यावसायिकांना सूट मिळाली. जिल्ह्यातील व्यवहार सुरू झाल्यामुळे व्यापारी, व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले असले तरी बाजारातील तुडुंब गर्दीमुळे प्रशासनाला मात्र कोरोना वाढण्याची चिंता लागली आहे.