अकोला : कोरोना संसर्गाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता अकोला महापालिका क्षेत्र, मुर्तीजापूर व अकोट नगर पालिका क्षेत्रांमध्ये लागू करण्यात आलेल्या संपूर्ण लॉकडाऊनचे नियम शुक्रवारपासून शिथील करण्यात येणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुरुवारी काढला. या आदेशानुसार आता प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या अकोला, मुर्तीजापूर व अकोट शहरांतील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी नऊ ते पाच या वेळेत खुली राहतील. शनिवार व रविवारी संपूर्ण लॉकडाऊन राहणार आहे. ६ व ७ मार्च रोजीचे शनिवार व रविवारी मात्र संचारबंदीचे नियम शिथिल राहणार आहेत. तथापी, कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे, अशाच दुकानदारांना दुकाने खुली ठेवण्याची मुभा राहणार आहे. दरम्यान, लग्नसमारंभ, हॉटेलबाबतच्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट ओढावत असल्यामुळे शहरातील व्यापारी संघटनांनी बुधवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची भेट घेऊन नियम शिथिल करण्याबाबत विनंती केली होती. नियोजनभवनात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या लक्षात घेत दुकाने उघडण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली. त्याचवेळी याबाबत विभागीय आयुक्तांचे मार्गदर्शन मागविल्यानंतर निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर गुरुवारी जिल्हाधिकारी पापळकर यांनी नियम शिथिल करण्याबाबतचा आदेश काढला. अकोला महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील इतर शहर व ग्रामीण भागांकरीता ४ मार्चच्या मध्यरात्रीपासून हे आदेश लागू राहणार आहेत. या आदेशानुसार, सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत खुली ठेवण्याची परवाणगी आहे. हॉटेल व खाद्यगृहे सकाळी ९ ते रात्री नऊ या वेळेत केवळ पार्सल सुविधेसाठी खुली राहणा आहेत. बार रेस्टॉरंट, मद्यगृहे देखील सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत केवळ पार्सल सुविधेसाठी खुली राहणार आहेत.
असे आहेत नियम
- हाॅटेल मधून सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत पार्सलच मिळेल
- सर्व पेट्रा्ेलपंप हे पाच वाजेपर्यंत खुले त्यानंतर अत्यावश्यक सेवेसाठी पाच पेट्राेलपंप रात्री ९ पर्यंत
- लग्नासाठी २५ वऱ्हाडी ही अट कायमच
- ज्या उद्योगांना सुरू ठेवण्याकरिता यापूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे, ते सर्व उद्योग सुरू ठेवण्याकरिता परवानगी राहील.
- सर्व प्रकारची शासकीय कार्यालये, बँका १५ टक्के किंवा १५ व्यक्ती यांपैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राह्य धरून सुरू राहतील.
- सर्व धार्मिक स्थळे पूर्णपणे बंदच
- सर्व प्रकारचे शैक्षणीक संस्था बंद राहतील.
- सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे व इतर संबंधित ठिकाणे ही बंद राहतील.
- सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलन हे या कालावधीत बंद राहतील.
कलम १४४ लागू
६ आणी ७ मार्च वगळता पुढील प्रत्येक शुक्रवारच्या रात्री ८ वाजेपासून तर साेमवारच्या सकाळी ६ वाजे पर्यंत संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत या दरम्यान मुक्त संचार करणाऱ्या नागरिकांवर कलम १४४ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे