- राजेश शेगोकार
अकोला: लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयांची गणिते बिघडविणारी वंचित बहुजन आघाडी व एमआयएम या जोडीने आता विधानसभेसाठी पुन्हा एकदा एकत्रीतरीत्या समोरे जाण्याची तयारी सुरू केली आहे. एमआयएमने वंचितकडे आघाडीमध्ये १०० जागा लढविण्याबाबत ई-मेलद्वारे प्रस्ताव दिल्याची चर्चा असून, हा प्रस्तावच वंचितच्या तयारीमध्ये जागा वाटप हा मुद्दा तिढा निर्माण करण्याची शक्यता आहे.लोकसभा निवडणुकीसाठी मुस्लीम, दलित व वंचित बहुजन अशा व्होट बँकेला कॅश करण्यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पाऊल उचलले होते. त्याचा फटका काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेसला तब्बल १५ लोकसभा मतदारसंघात बसला. त्यामुळे आता काँग्रेसने वंचितसोबत आघाडी करण्यासाठी अनुकूलता दाखविली आहे. आघाडीमध्ये वंचितला जागा किती, हा कळीचा मुद्दा असल्याने काँगे्रस आघाडीसोबतची चर्चाही अजून प्राथमिक अवस्थेतच आहे. दुसरीकडे एमआयएमने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मिळविलेल्या यशामुळे तसेच वंचितच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे एमआयएमलाही महत्त्वाकांक्षेचे घुमारे फुटले आहेत. वंचितच्या मतदारांनी एमआयएमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्यास राज्यातील १०० मतदारसंघात निकाल फिरू शकतात, असा दावा एमआयएमकडून केला जात असून, त्यामधूनच शंभर जागांची मागणी पुढे आल्याची चर्चा आहे. अॅड. आंबेडकरांचा गड असलेल्या अकोल्यातील पाचपैकी तीन मतदारसंघावर एमआयएमचा डोळा असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळेच जागा वाटप या मुद्यावरून वंचित व एमआयएम यांच्यामध्ये तिढा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित व एमआयएमच्या आघाडीने आपली ताकद दाखवून दिली आहे. विधानसभेसाठीही आम्ही सज्ज आहोत. जागा वाटपाबाबत अद्यापपावेतो चर्चेची बैठक झालेली नाही. बाळासाहेबांनी एमआयएमसोबत चर्चेकरिता मनोहर रोकडे, शंकरलाल बारिंगे, सुभाष तन्वर यांची नियुक्त केली आहे. सध्या तरी केवळ माध्यमांमध्येच चर्चा आहे.- अशोक सोनोने, प्रदेशाध्यक्ष, भारिप-बमसं.