अकोला: वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला व सोलापूर या दोन्ही मतदारसंघांत उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने त्यांना या दोन मतदारसंघांसह राज्यभरातील ‘वंचित’च्या उमेदवारांचा प्रचार करावा लागणार असल्याने अकोल्यातील प्रचाराची सूत्रे प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हातात राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रचारासाठी एक कोअर ग्रुप स्थापन करण्यात आला असून, त्यांच्यासोबत प्राथमिक चर्चा करून ‘वंचित’ची रणनीती ठरणार असल्याचे समजते.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ओसरलेली मोदी लाट अन् बहुजनांच्या मतांवर ‘वंचित’ची भिस्त असून, ओबीसीमधील लहान समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांची ताकद एकत्र करण्याची गणिते मांडली जात आहेत. वर्षभरापूर्वीच प्रा. अंजलीतार्इंनी अकोल्यातील सूत्रे हातात घेऊन जिल्हा पिंजून काढला होता. विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी मतदारांसोबतचा संपर्क कायम ठेवला असल्याने ‘वंचित’ची धुरा त्या समर्थपणे सांभाळतील, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. खुद्द बाळासाहेब आंबेडकर प्रचारातील महत्त्वाच्या टप्यांवर स्वत: मतदारांच्या संपर्कात राहतील, असेही नियोजन केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.