- राजेश शेगाेकारअकाेला : मालमत्ता कर कमी करा, चुकीच्या पद्धतीने आकारली जाणारी पाणीपट्टी थांबवा, पिंप्री चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यात यावे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर खुलेनाट्यगृहाचे सौदर्यीकरण करुन परिसरात स्वच्छता ठेवण्यात यावी, कलावंतासाठी सांस्कृतिक भवन सुरु करण्यात यावे आदी मागण्यांसाठी वंचित बहुजन महासंघ महानगर शाखेने सोमवार २० मार्च रोजी महापालिकेवर माेर्चा काढला.
वंचित बहुजन महासंघाच्या वतीने महानगराध्यक्ष शंकरराव इंगळे यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन महासंघाच्या कार्यालयातून निघालेला माेर्चा प्रमुख मार्गावरून महापालीकेवर धडकला. यावेळी वंचितच्या नेत्यानी अकाेल्यातील मुलभूम समस्या कायमच असल्याचा आराेप केला. अतिक्रमीत जागा नियमानुकुल करुन घरकुलाचा प्रश्न मार्गी लावावा, घनकचरा व्यवस्थापन व विल्हेवाट लावण्याकरीता कायमस्वरुपी झोननिहाय डम्पिंग ग्राऊंडची व्यवस्था करावी अशा अनेक मागण्यांचा यावेळी उहापाेह करण्यता आला. यावेळी माेर्चातील नेत्यांच्या शिष्ट मंडळाने मनपा आयुक्तांना निवेदन दिले. यावेळी निलेश देव, अरुंधती शिरसाट, संतोष हुशे, वंदना वासनिक, मनोहर पंजवानी, सुशिला जाधव, सरला मेश्राम, आशिष मांगुळकर, जय तायडे, कुणाल राऊत, पराग गवई आदी उपस्थित होते तर मोर्चात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.