- अतुल जयस्वाल अकोला - जिल्हा हौशी क्रिकेट संघटना, अकोला व अकोला क्रिकेट क्लबच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजित व्हीसीए टी-२० आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत मंगळवार, ७ मे रोजी पार पडलेल्या दोन सामन्यांमध्ये वाशिमच्या संघाने अकोला संघाला, तर भंडारा संघाने गोंदिया संघाला पराभूत केले.
उमरी येथील स्व. अरुण दिवेकर क्रीडांगणावर खेळविल्या गेलेल्या सामन्यात अकोला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. वाशिमच्या संघाने हा टिच्चून गोलंदाजी केल्याने अकोला संघाला निर्धारित २० षटकेही खेळता आली नाही. अकोल्याचा संपूर्ण संघ १८.५ षटकात १४८ धावा करून तंबुत परतला. लक्ष्याचा पाठलाग करताना वाशिमची सुरुवातही खराब झाली. परंतु मधल्या फळीने दमदार फलंदाजी केल्याने वाशिम संघाने सात गड्यांच्या मोबदल्यात १९.५ षटकात १५२ धावा करत सामना खिशात घातला. सामन्यात चार गडी बाद करणारा वाशिमचा अध्ययन डागा सामनावीर ठरला. पंच म्हणून अनिल एदलाबादकर व संदीप कपूर, तर स्कोअरर म्हणून सावरमल शर्मा यांनी काम पाहिले.
भंडाराने गोंदियाला नमवलेअकोला क्रिकेट क्लब मैदानावर खेळविल्या गेलेल्या सामन्यात गोंदिया संघाने नाणेफेकचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करत १७.१ षटकांमध्ये सर्व गडी गमावत १४१ धावा उभारल्या. धावांचा पाठलाग करताना वाशिम संघाने १७.२ षटकांमध्ये केवळ ४ गडी गमावत १४२ धावा करून सामना सहा गड्यांनी जिंकला. १२ चौकारांच्या सहाय्याने केवळ ५२ चेंडूत नाबाद ७५ धावा करणारा सिद्धेश वाठ हा सामनावीर ठरला. पंच म्हणून आशिष सोळंके व संजय बुंदेले, तर स्कोअरर म्हणून नीलेश लखाडे यांनी काम पाहिले.फोटो आहेत