अकोला, दि. १३- विदर्भात थंडीची लाट आली असून, येत्या चोवीस तासात ही लाट कायम राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे. मागील चोवीस तासात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कृषी विद्यापीठाच्या परिसरात ५.0 अंश तपामानाची नोंद केली आहे. त्यामुळे जिल्हय़ात हुडहुडी भरली असून, ग्रामीण भागात पुन्हा शेकोट्या पेटल्या आहेत. ही थंडी रब्बीतील गहू, हरभरा, मोहरी पिकाला पोषक असली तुरीच्या शेंगा, केळी व इतर फळपिकांना बाधक ठरू शकते. या थंडीमुळे तुरीच्या शेंगा परिपूर्ण कालावधीच्या अगोदर परिपक्व होत आहेत.जानेवारी महिन्यात किमान तापमानात चढ-उतार वाढला असून, ११ जानेवारीपासून किमान तापमानात कमालीची घसरण झाली आहे. ११ जानेवारीला कृषी विद्यापीठाने ६.२ किमान तापमानाची नोंद केली आहे. १२ जानेवारीला ५.४ तर १३ जानेवारीला हे तापमान ५.0 शून्य अंशावर आले आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या १८ तारखेला ९.६, १९ नोव्हेंबरला ९.२, २0 ला ९.0, २१ नोव्हेंबरला ९.६, २२ ला ९.५, २३ तारखेला ९.७ एवढे किमान तापमान होते. तर डिसेंबर महिन्यात १0 तारखेला ७.१, १९ डिसेंबरला ७.२, २0 ला ८.0, २२ रोजी ८.१, तर सर्वाधिक कमी तापामन २७ डिसेंबरला ५.८ अंश होते. मागील तीन वर्षात हे सर्वाधिक कमी तापमान कृषी विद्यापीठाने नोंदवले आहे. या थंडीमुळे तुरीच्या शेंगा कालावधी पूर्ण होण्याच्या अगोदर परिपक्व होत आहेत. थंडीमुळे अन्नद्रव्याचा पुरवठा तुरीच्या शेंगांना होत नसल्याने फेब्रुवारीत तयार होणारे हे पीक अनेक ठिकाणी आताच काढणीला आले आहे. अंबिया बहार संत्र्याच्या फुलोर्यावरही थंडी बाधक तर आहेच केळी पिकांवर जास्त परिणाम करणारी ठरू शकते. थंडीची लाट; काळजी घ्या - जिल्हाधिकारीयेत्या ४८ तासात जिल्हय़ात थंडी वाढणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला असून, जिल्हय़ातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.अतिरिक्त थंडीमुळे केळी लवकर पिवळी पडण्याची शक्यता असल्याने केळी उत्पादक शेतकर्यांनी शेताच्या बांधावर काडीकचरा पेटवून धूर करावा त्यामुळे थंडीपासून फळांचा बचाव करता येईल. रब्बीतील हरभरा, गहू पिकांसाठी ही थंडी पोषक आहे. मोहरीदेखील या थंडीने चांगली येईल. शेतकर्यांनी फळ पिक ांची काळजी घ्यावी.- डॉ. प्रदीप इंगोले,संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
अकोला गारठले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2017 1:20 AM