लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: खारपाणपट्ट्यातील खांबोरा ६४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या विशेष दुरुस्तीच्या कामासाठी टंचाई अंतर्गत ९९ लाख ३२ हजार ४०० रुपये अंदाजपत्रकीय किमतीच्या प्रस्तावानुसार ७४ लाख ३१ हजार रुपये निधी देण्यास पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने १३ मे रोजी मंजुरी दिल्यानंतर ते काम १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याची डेडलाइन दिली होती. मुदतीच्या तब्बल तीन महिन्यांनंतर दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. आता योजनेतील गावांना तीन दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी म्हटले आहे.खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून खांबोराजवळील उन्नई बंधाऱ्यात पाणी सोडण्यात येते. तेथून योजनेंतर्गत गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो; मात्र पाणी पुरवठा करण्यासाठी १५ वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या पंपांची पाणी फेकण्याची क्षमता कमी झाली आहे. जलवाहिनीही ठिकठिकाणी शिकस्त झाली आहे.त्यामुळे या योजनेंतर्गत गावांना दररोज नियमित पाणी पुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे योजनेंतर्गत गावांना आठ ते पंधरा दिवसांआड पाणी पुरवठा करण्यात आला. २०१९ च्या पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात खांबोरा ६४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या विशेष दुरुस्तीचा प्रस्ताव होता. त्यानुसार योजनेवर अवलंबून गावांना दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी योजनेची विशेष दुरुस्ती करणे तसेच या योजनेंतर्गत उगवा गावाचा समावेश करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद मुख्य कार्यकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना सादर केला. खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजना विशेष दुरुस्ती कामाची अंदाजपत्रकीय किंमत ९९ लाख ३२ हजार ४०० रुपये होती. तो प्रस्ताव आयुक्तांमार्फत शासनाकडे सादर करण्यात आला.शासनाने निधी मंजूर करताना त्यामध्ये २५ लाखांची कपात केली. त्यानुसार ७४ लाख रुपये निधी देण्यात आला. निधी देतानाच विशेष दुरुस्तीचे काम जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून केले जाईल. त्यासाठी निविदा प्रक्रिया २९ मेपर्यंत पूर्ण न झाल्यास शासनाची मंजुरी रद्द होईल, तसेच १५ जूनपर्यंत काम पूर्ण करण्याची डेडलाइनही ठरवून दिली. या दोन्ही मुदतीत जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे तब्बल तीन महिने उशीर झाला. गुरुवारी नवीन पंपातून पाणी पुरवठा सुरू झाला. त्यानुसार योजनेतील गावांना तीन दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. विशेष म्हणजे, आता योजनेच्या दुरुस्तीनंतर देखभाल व दुरुस्ती ग्रामपंचायतमार्फत करावी लागणार आहे.
अकोला: ६४ खेडी योजनेतून तीन दिवसाआड पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 1:56 PM