लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अडीच महिन्यांपासून इमारतीचा अतिक्रमित भाग न हटवल्यामुळे गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाला विलंब झाला. तुम्हाला स्वत: इमारतीचा भाग तोडण्याची मुभा दिली होती. हा शहराच्या विकासाचा प्रश्न असल्यामुळे आता आमचीच यंत्रणा इमारतीचा भाग काढणार असल्याचे स्पष्ट करत महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गोरक्षण रोडवरील मालमत्ताधारकांना सुनावले. बुधवारी सकाळी मनपाच्यावतीने गोविंद सोढा यांच्या इमारतीचा भाग तोडण्याची कारवाई सुरू झाल्यामुळे गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाचे रखडलेले काम निकाली निघणार आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांमध्ये समावेश असणार्या गोरक्षण रोडच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाले असतानाच महापारेषण कार्यालय ते इन्मक टॅक्स चौक ते लक्ष्मी हार्डवेअरपर्यंतच्या मार्गावर ‘बॉटल नेक’ निर्माण होण्याची चिन्ह होती. महापालिका प्रशासनाने रस्ता रुंदीकरणासाठी रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूंच्या इमारतींचे मोजमाप करून इमारतींचा अतिक्रमित भाग तोडण्याची कारवाई सुरू केली होती. मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांची १0 नोव्हेंबर रोजी बदली होताच गोरक्षण रोडचे काम मंदावल्याचे समोर आले. त्यावेळी महापारेषण कार्यालय ते इन्कम टॅक्स चौकातील काही मालमत्ताधारकांना त्यांच्या इमारतींचा भाग तोडण्यासाठी मुदत दिली होती. मुदतीचा कालावधी उलटून गेल्यावरही काही मालमत्ताधारकांनी इमारतीचा भाग तोडलाच नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. या प्रकारामुळे गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाचे काम खोळंबले होते. मध्यंतरी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी संबंधित मालमत्ताधारकांना मनपात पाचारण करून त्यांना तातडीने इमारतीचा भाग हटविण्याचे निर्देश दिले होते. अखेर बुधवारी मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या उपस्थितीत गोविंद सोढा यांच्या इमारतीचा भाग तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली. जेसीबीचा वापर न करता मजुरांच्या माध्यमातून इमारत तोडण्याला प्रारंभ करण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चौव्हान, मनपाचे नगररचनाकार विजय इखार, शहर अभियंता इक्बाल खान, सहा. नगररचनाकार संदीप गावंडे, राजेंद्र टापरे, क्षेत्रीय अधिकारी आर. घनबहाद्दुर, विद्युत विभाग प्रमुख अमोल डोईफोडे उपस्थित होते.
मुक्ता प्लाझावर संक्रांत?मनपाने इन्कम टॅक्स चौकातील मुक्ता प्लाझा कॉम्प्लेक्सच्या तळघराची जागा रस्त्यासाठी संपादित केली आहे. कॉम्प्लेक्सपासून विद्युत वाहिनी जाणार असल्यामुळे पहिल्या मजल्यावरील किमान साडेचार फूट जागा महावितरण व मनपा प्रशासनाला घ्यावी लागणार आहे; अन्यथा महावितरणच्या निकषानुसार विद्युत वाहिनीचे जाळे टाकता येणार नाही. त्यामुळे मुक्ता प्लाझावर संक्र ांत येण्याची दाट चिन्ह आहेत.
गोरक्षण रोडची केली पाहणीमहापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी बुधवारी गोरक्षण रोडच्या कामाची व रस्त्यालगतच्या इमारतींची पाहणी केली. रस्त्याच्या आड येणार्या इमारतींचा भाग काढावाच लागणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यासंदर्भात काही मालमत्ताधारकांसोबतही त्यांनी चर्चा केली.