अकोला: ‘अमृत’ योजनेच्या माध्यमातून शहरात नवीन जलवाहिनीचे जाळे टाकल्या जात आहे. यासाठी खोदण्यात आलेल्या मुख्य रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करण्याचे आदेश महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी ‘एपी अॅण्ड जीपी’कंपनीच्या प्रतिनिधींना दिले होते. कंपनीने प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीला ठेंगा दाखवत अद्यापपर्यंतही रस्ते दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ केला नसल्याचे चित्र आहे. या कामावर तांत्रिक सल्लागार म्हणून कर्तव्य बजावणारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व मनपाच्या जलप्रदाय विभागाने झोपेचे सोंग घेतल्याचे दिसून येत आहे.केंद्र व राज्य शासनाच्या ‘अमृत योजने’च्या माध्यमातून शहरात भूमिगत गटार योजना व संपूर्ण शहराची जलवाहिनी बदलण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या दोन्ही कामांवर देखरेख ठेवण्यासाठी शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्त केले. शहरात पहिल्या टप्प्यात ८७ कोटी रुपयांतून जलवाहिनीचे जाळे टाकण्याचा कंत्राट ‘एपी अॅण्ड जीपी’ कंपनीला देण्यात आला आहे. १४७ किलोमीटर महान धरण ते अकोला शहरापर्यंत आणि २६५ किलोमीटर शहरातील अंतर्गत भागात नवीन जलवाहिनी टाकल्या जाणार आहे. सद्यस्थितीत शहराच्या प्रमुख रस्त्यांलगतचा भाग खोदून जलवाहिनी टाकल्या जात आहे. खोदकाम केलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे अपेक्षित असताना मागील तीन ते चार महिन्यांपासून कंत्राटदाराने रस्ते दुरुस्तीला प्रारंभ केला नसल्याचे समोर आले आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीचा खर्च मनपा प्रशासनाकडून अदा केला जाणार असल्याची माहिती आहे. सध्या पावसाचे दिवस लक्षात घेता व ठिकठिकाणी मुख्य रस्त्यांची दुरवस्था पाहता कंत्राटदाराने रस्ते दुरुस्तीला प्रारंभ करण्याची मागणी अकोलेकर करीत आहेत.आयुक्तांच्या आदेशानंतर किती रस्त्यांची दुरुस्ती?जलवाहिनीचे जाळे टाकल्यानंतर संबंधित रस्त्याची दुरुस्ती करून देण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची आहे. कंपनीचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दोन महिन्यांपूर्वी आधी रस्ते दुरुस्त करा, त्यानंतरच नवीन जलवाहिनीचे जाळे टाकण्याचा आदेश कंत्राटदाराला दिला होता. या दोन महिन्यांच्या कालावधीत कंत्राटदाराने किती रस्त्यांची दुरुस्ती केली, याचा मनपाकडे कोणताही लेखाजोखा नसल्याची माहिती आहे.
सत्ताधाऱ्यांसह विरोधकांची चुप्पी!जलवाहिनीचे जाळे टाकणाºया कंपनीकडून मुख्य रस्त्यांची ऐशीतैशी केली जात असताना त्याला आवर घालण्याची जबाबदारी असणाºया सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्ष काँग्रेसने चुप्पी साधणे पसंत केले आहे. तोंडावर बोट ठेवण्यासाठी नेमका कोणता व्यवहार पार पडला, याबद्दल अकोलेकरांमध्ये चर्चेला ऊत आला आहे.