संजय खांडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडाळाच्या अ त्याधुनिक वातानुकूलित प्रवासी सेवेची शिवशाही विशेष गाडी आता ३ ऑक्टोबरपासून अकोल्यातून धावणार आहे. पुणे- अकोला आणि अकोला-पुणे ही पहिली शिवशाही प्रायोगिक तत्त्वावर ऐन सणासुदीच्या तोंडावर सुरू केल्याने, अकोलेकरांना ती दिवाळीची भेट ठरली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडाळाने काही महिन्याआधी अत्याधुनिक वातानुकूलित बस सेवा राज्यात सुरू केली. पहिल्या टप्प्यात पुणे, कोल्हापूर, सांगली आदी ठिकाणी ही सेवा सुरू केली. प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर, आता अकोल्यातही ही सेवा सुरू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यासंबंधीचे पत्र अकोला मध्यवर्ती बसस्थानक आगार क्रमांक दोनचे व्यवस्थापक ए.पी. पिसोळे यांना मिळाले आले आहे. इतर बसगाड्यांपेक्षा शिवशाहीचे प्रवासी भाडेही जास्त नसल्याने अकोल्यातूनही चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. पुणे-अकोला आणि अकोला-पुणे मार्गासाठी दोन शिवशाही धावणार आहेत. २ ऑक्टोबरला पुण्याहून अकोल्यासाठी पहिली शिवशाही निघणार आहे, तर ३ ऑक्टोबरला अकोल्या तून पुण्याकडे ही गाडी धावणार आहे. संपूर्ण वातानुकूलित या प्रवासी गाडीला चांगला प्रतिसाद मिळाल्यास स्लीपर कोच सुरू करण्याचा विचार महामंडळ करणार आहे. अकोला- पुणे मार्गावर धावणार्या शिवशाही गाडीला खामगाव आणि औरंगाबाद हे दोनच थांबे दिले आहेत. त्यामुळे शिवशाहीला अकोला-पुणे येथून चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
प्रवासी पुन्हा वळतील..काही महिन्यांपासून महामंडळाने लांब पल्ल्याच्या गाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेक प्रवासी खासगी लक्झरी बसेसकडे वळले होते. मात्र, सणासुदीच्या निमित्ताने आता अ त्याधुनिक शिवशाही सुरू होत असल्याने प्रवासी पूर्ववत महामंडळाकडे वळण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते.
राज्यात टप्प्या-टप्प्याने शिवशाहीच्या वातानुकूलित गाड्या सर्वत्र धावणार आहेत. राज्याच्या तुलनेत विदर्भात गाड्या नाही, असे म्हणता येणार नाही. अद्ययावत सेवेच्या १५ गाड्याच राज्यात सुरू झाल्यात. त्यात विदर्भासाठी दोन शिवशाही आहेत, यापुढेही त्या वाढविता येतील. -दिवाकर रावते, परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई.