अकोला : श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे १९ व २० फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या श्रीलंका मास्टर्स ओपन ॲथलेटिक्स स्पर्धेत अकोल्याच्या ५३ वर्षीय महिला धावपटू माधुरी प्रकाश दाते यांनी २०० व ४०० मीटर धावण्याच्या प्रकारात दोन कांस्य पदक पटकावून शहरासोबतच देशाचे नाव उज्ज्वल केले. श्रीलंका मास्टर्स ॲथेलेटिक्सच्यावतीने घेण्यात आलेल्या प्रौढांच्या या स्पर्धेत जगभरातून ज्येष्ठ स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये महाराष्ट्रातील २१ स्पर्धकांमध्ये अकोल्याच्या माधुरी दाते यांचाही समावेश आहे. शनिवार, १९ फेब्रुवारी रोजी त्यांनी २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सहभाग नोंदवून कांस्य पदक पटकावले.
रविवार, २० फेब्रुवारी रोजी माधुरी दाते यांनी ५० ते ५५ या वयोगटातील धावण्याच्या १०० मीटर व ४०० मीटर अशा दोन प्रकारांमध्ये सहभाग नोंदविला. यापैकी १०० मीटर स्पर्धेत त्या चौथ्या क्रमांकावर राहिल्या, तर ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत तिसरा क्रमांक पटकावत कांस्य पदकांची कमाई केली. या तिन्ही शर्यतींमध्ये श्रीलंकेच्या महिला धावपटू अव्वल राहिल्या. अकोला मास्टर्स ॲथलेटिक्स असोसिएशनशी संबंधित असलेल्या माधुरी दाते यांना प्रशिक्षक सागर देशमुख व संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत तराळ यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
महाराष्ट्र मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेत तीन सुवर्ण
जानेवारी महिन्यात अकोला येथे पार पडलेल्या महाराष्ट्र मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेत माधुरी दाते यांनी स्वर्णिम कामगिरी केली होती. गृहमैदानावर दमदार प्रदर्शन करत तीन सुवर्ण पदकांची कमाई केली होती. या कामगिरीच्या बळावरच त्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली, हे विशेष.
गृहिणी, ब्युटीशियन ते ॲथलिट
माधुरी दाते या व्यवसायाने ब्युटीशियन आहेत. गत तीस वर्षांपासून त्या ब्युटीपार्लरचा व्यवसाय करतात. यासोबतच त्या कुशल गृहिणी असून, वृद्ध सासू-सासऱ्यांची देखभाल करतात. त्यांचे पती प्रकाश दाते हे भारतीय वायू सेना व भारतीय स्टेट बँकेतील नोकरीतून सेवानिवृत्त झाले आहेत. एवढा व्याप सांभाळून माधुरी दाते यांनी धावपटू म्हणून वेगळी ओळख निर्माण केली व आंतराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्वल केले.