अकोला: जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत समुपदेशनाद्वारे ८४ शिक्षकांची बदली शुक्रवारी करण्यात आली असून, बदली करण्यात आलेल्या शिक्षकांना पद्स्थापना देण्यात आली आहे. त्यामध्ये मराठी माध्यमाच्या ७४ आणि उर्दू माध्यमाच्या १० शिक्षकांचा समावेश आहे.सन २०१८ मध्ये जिल्हा परिषद शिक्षक बदली प्रक्रियेत रँडम राउंडमध्ये बदली झालेले आणि त्यापैकी ज्यांना बदली हवी आहे, असे शिक्षक, आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत विस्थापित झालेले शिक्षक आणि आंतरजिल्हा बदलीने अकोला जिल्हा परिषदेत रुजू झालेल्या शिक्षकांना समुपदेशनाद्वारे पद्स्थापना देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहात शिक्षकांची बदली प्रक्रिया राबविण्यात आली. समुपदेशनाद्वारे करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये मराठी माध्यमाच्या ७४ आणि उर्दू माध्यमाच्या १० शिक्षकांची बदली करण्यात आली. त्यामध्ये मराठी माध्यमाचे २ मुख्याध्यापक, ९ विषय शिक्षक, ५८ सहायक शिक्षक आणि ५ आंतरजिल्हा बदली शिक्षकांचा समावेश आहे. तसेच उर्दू माध्यमाच्या १ विषय शिक्षक व ९ सहायक शिक्षकांची बदली करण्यात आली आहे. समुपदेशनाव्दारे बदली करण्यात आलेल्या शिक्षकांना पद्स्थापना देण्यात आली आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण, शिक्षण सभापती पुंडलीकराव अरबट, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर ढवळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशली ठग व संबंधित शिक्षकांच्या उपस्थितीत समुपदेशनाद्वारे बदली प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.