अकोला : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे १५ दिवसांच्या रजेवर गेले आहेत. त्यांचा प्रभार सोमवारी सायंकाळपर्यंत कोणाहीकडे सोपवण्यात आला नव्हता. शासनाकडून उद्यापपर्यंत प्रभारी अधिकाऱ्याचे नाव जिल्हा परिषदेला कळवले जाण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषदेचा कार्यकाळ ३० डिसेंबर रोजी संपुष्टात येत आहे. तोपर्यंत विद्यमान पदाधिकाºयांकडून रखडलेल्या कामांसाठी होणारा पाठपुरावा त्रासदायक ठरू शकतो. त्यापासून सुटका करून घेण्यासाठी पगारे यांनी रजा घेतल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात आहे. त्याचवेळी ३० डिसेंबरनंतर जिल्हा परिषद पदाधिकाºयांना मुदतवाढीबाबतही निर्णय होणार आहे. त्या निर्णयाची शक्यता पाहता पगारे नवीन वर्षातच रूजू होणार असल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, पगारे यांना राज्यसेवेतून भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे. या बदलानुसार त्यांना प्रशिक्षणासाठीही जावे लागण्याची शक्यता आहे. रूजू होतानाच त्यांना प्रशिक्षणासाठी जावे लागल्यास तो कालावधीही ४५ दिवसांचा राहणार आहे. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पगारे रुजू होतात की बदली करून घेतात, यावरही तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
डीएचओ राठोड अखेर कार्यमुक्तजिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. एम.एम.राठोड यांची शासनाने बदली केली. त्या आदेशाला राठोड यांनी महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे आव्हान दिले. तेथे त्यांची याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे त्यांना शनिवारी जिल्हा परिषदेतून कार्यमुक्त करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर केवळ सात महिने होत असताना १३ जून २०१८ रोजी बदलीचा आदेश निघाला. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या बदली आदेशानुसार डॉ. राठोड यांची बदली सहायक संचालक आरोग्य (कुष्ठ) अकोला या पदावर झाली. शासनाने कोणत्या आधारावर बदली केली, या बाबीच्या पडताळणीसह आदेशाला आव्हान देणारी याचिका त्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे दाखल केली होती.