लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: आंतरजिल्हा बदलीने पदस्थापना दिलेल्या ७६ शिक्षकांना पदस्थापना दिल्याच्या फायलीच जिल्हा परिषदेत उपलब्ध नाहीत. या प्रकरणात संबंधित शिक्षकांसह शिक्षण विभागातील तत्कालीन वरिष्ठ, कनिष्ठ सहायक, कक्ष अधिकारी, प्रशासन अधिकारी अशा नऊ जणांना नोटीस बजावण्यात आल्या. त्यापैकी चौघांनीच स्पष्टीकरण दिले आहे, त्यामुळे इतरांना स्मरणपत्र देण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे.
अकोला जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांमुळे बिंदूनामावलीचा मोठा घोळ झाला आहे. परिणामी, शिक्षकांची बिंदूनामावलीही मंजूर होऊ शकली नाही. त्या घोळाची चौकशी अमरावती विभागाचे उपायुक्त (विकास) यांच्या पथकाने केली. त्यामध्ये जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या ७६ शिक्षकांच्या फायली नव्हे, तर केवळ आदेशाच्या प्रती उपलब्ध आहेत. त्या आदेशानुसार जिल्हा परिषदेत पदस्थापना देण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयात फाइल कोणी तयार केली, त्या फाइलला कोणी मंजुरी दिली, त्यानुसार शिक्षकांना पदस्थापना देण्यासाठीचे आदेश कोणी दिले, फाइल सुरू होण्यापासून शेवटपर्यंतचा प्रवास, याबाबतचा कुठलाच कागद जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात उपलब्ध नाही. त्या शिक्षकांना फाइल सादर करण्याची नोटीस मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी २ डिसेंबर रोजी दिली. त्यासोबतच या प्रकाराला जबाबदार असलेल्या शिक्षण विभागातील सर्व संबंधित अधिकारी-कर्मचार्यांनाही नोटीस बजावली. त्यापैकी चौघांनी स्पष्टीकरण देत त्यावेळी प्रभार घेतानाच फायली मिळाल्या नसल्याचे म्हटले आहे.
फायली गहाळ केल्याची संख्याही निश्चितइतर जिल्हा परिषदेतून आलेले शिक्षक रुजू झाल्यानंतर त्यांच्या फाइल जतन करण्याची जबाबदारी अकोला जिल्हा परिषदेची आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचार्यांनी फाइल सादर न केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ अन्वये कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. नोटीसप्राप्त अधिकार्यांमध्ये सेवानवृत्त कक्ष अधिकारी रंजना गेडाम यांना तीन, सध्या बाश्रीटाकळी येथे कार्यरत तत्कालीन सहायक प्रशासन अधिकारी दिलीप सिरसाट-आठ, बाळापूर पंचायत समितीमध्ये कार्यरत लेखा विभागाचे कनिष्ठ सहायक दिनेश ढाकरे-एक, कार्यमुक्त कनिष्ठ सहायक बिपिन कमाविसदार यांच्यावर आठ फायलींची जबाबदारी निश्चित आहे.
सर्वाधिक फायलींसाठी संतोष टाले जबाबदारगहाळ झालेल्या ७६ पैकी ३२ फायलींची जबाबदारी तेल्हारा पंचायत समितीमध्ये कार्यरत लेखा विभागाचे कनिष्ठ सहायक संतोष टाले यांच्यावर आहे, तसेच स्पष्टीकरण दिलेल्या चौघांपैकी दोघांनी प्रभार घेताना टाले यांच्याकडून फायली मिळाल्याच नसल्याचे म्हटले.
स्पष्टीकरणात जबाबदारी झटकलीफायली गहाळ केल्याची नोटीसप्राप्त चौघांनी स्पष्टीकरणात हात वर केले आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषद आगरकर विद्यालयातील वरिष्ठ सहायक विजय भिवरकर यांनी चार फायली, पाणी पुरवठा विभागातील वरिष्ठ सहायक एन.एम. कढाणे-तीन, रोहयो कक्षातील सहायक लेखा अधिकारी एस.बी. नृपनारायण-सात, मूर्तिजापूर पंचायत समितीचे कनिष्ठ सहायक पी.पी. लावंड यांच्यावर सात फायलींची जबाबदारी निश्चित झाली आहे.