अकोला : जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगामार्फत मंगळवार, २२ जून रोजी जाहीर करण्यात आला. त्यानुसार अकोला जिल्हा परिषदेच्या १४ आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या २८ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २९ जूनपासून सुरू होणार असून, १९ जुलै रोजी मतदान घेण्यात येणार आहे. पोटनिवडणूक होत असलेल्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समित्यांच्या गणांच्या क्षेत्रांत जिल्हा प्रशासनामार्फत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या दीड वर्षापूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देण्यात आल्याने, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) प्रवर्गातून निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून रिक्त पदांसाठी पुन्हा निवडणूक घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गत ४ मार्च रोजी दिला होता. त्यानुसार जिल्ह्यात ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या जिल्हा परिषदेच्या १४ आणि सात पंचायत समित्यांच्या २८ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची रिक्त पदे सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सर्वसाधारण महिला प्रवर्गाच्या आरक्षणाची सोडत काढण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाच्या परिस्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुका घेण्यास गत दोन महिन्यांच्या कालावधीत स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगामार्फत २२ जून रोजी घोषित करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १४ आणि त्याअंतर्गत सात पंचायत समित्यांच्या २८ रिक्त पदांसाठी पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत. या पोटनिवडणुकांसाठी ऑनलाइन उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया २९ जूनपासून सुरू होणार असून, १९ जुलै रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यानुषंगाने पोटनिवडणूक होत असलेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २८ गणांच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या ‘या’ १४ गटांसाठी होत आहे पोटनिवडणूक!
तेल्हारा तालुका : दानापूर, अडगाव बु., तळेगाव बु.
अकोट तालुका : अकोलखेड, कुटासा.
मूर्तिजापूर तालुका : लाखपुरी, बपोरी.
अकोला तालुका : घुसर, कुरणखेड, कानशिवणी.
बाळापूर तालुका : अंदुरा, देगाव.
बार्शिटाकळी तालुका : दगडपारवा.
पातूर तालुका : शिर्ला
पोटनिवडणूक होत असलेले असे आहेत पंचायत समित्यांचे २८ गण!
तेल्हारा तालुका : हिवरखेड, अडगाव बु., वाडी अदमपूर, भांबेरी.
अकोट तालुका : प्रिंप्री खुर्द, अकोलखेड, मुंडगाव, रौंदळा.
मूर्तिजापूर तालुका : लाखपुरी, ब्रह्मी खुर्द, माना, कानडी.
अकोला तालुका : दहीहांडा, घुसर, पळसो, कुरणखेड, चिखलगाव.
बाळापूर तालुका : निमकर्दा, पारस भाग १, देगाव, वाडेगाव भाग २.
बार्शिटाकळी तालुका : दगडपारवा, मोऱ्हळ, महान, पुनोती बु.
पातूर तालुका : शिर्ला, खानापूर व आलेगाव.
राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू!
जिल्हा परिषद व त्याअंतर्गत जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांसह इतर राजकीय पक्षांकडून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांची मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे.
उमेदवारीसाठी इच्छुकांच्या ‘फिल्डिंग’ला आला वेग!
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या रिक्त पदांसाठी पाेटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होण्यास केवळ सात दिवसांचा कालावधी उरला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची पोटनिवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांसह समर्थकांकडून पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी संबंधित पक्षश्रेष्ठींकडे ‘फिल्डिंग’ लावण्याच्या प्रक्रियेलाही आता वेग आला आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १४ आणि पंचायत समित्यांच्या २८ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोटनिवडणूक होत असलेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समित्यांच्या गण क्षेत्रांत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
- संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी