लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा परिषद मतदारसंघातून निवड होणार्या चार सदस्यांसाठी जिल्हा परिषदेतील सत्ताधारी भारिप-बमसं, तसेच विरोधी पक्ष भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल होणार असल्याने सदस्यांची निवड मतदानातून होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपच्या तीन उमेदवारांचे अर्ज उद्या, शुक्रवारी दाखल होण्याची शक्यता आहे. जिल्हा नियोजन समितीच्या १४ सदस्यांची पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषद म तदारसंघातून चार, महानगरपालिका मतदारसंघातून सात व नगरपालिका म तदारसंघातून तीन सदस्यांची निवड करण्यासाठी २९ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी ८ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची संधी आहे. जिल्हा परिषद मतदारसंघातील चारपैकी तीन पदे सदस्यांच्या मृत्यूमुळे रिक्त झाली आहेत. तर जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे नियोजन समितीमध्ये त्या पदसिद्ध उपाध्यक्ष असल्याने त्यांची राखीव पदाची जागा रिक्त झाली. त्या पदांवर निवड होण्यासाठी भारिप-बमसंने गुरुवारी अर्ज दाखल केले. त्यामध्ये अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या गोपकर यांच्या जागेवर सरला मेश्राम, अनुसूचित जमातींसाठी राखीव जागेसाठी श्रीकांत खोणे, इतर मागासवर्गासाठी राखीव जागेवर संजय आष्टीकर यांचा समावेश आहे. तर सर्वसाधारण जागेसाठी पक्षाकडून उद्या अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. नियोजन समितीमध्ये निवड होण्यासाठी भाजपने सर्वसाधारण जागेवर अहिल्या गावंडे यांचा अर्ज दाखल होणार आहे. तर इतर उमेदवारांमध्ये मेश्राम यांच्या लढती त विलास इंगळे, आष्टीकर यांच्याविरुद्ध मनोहर हरणे यांचा अर्ज दाखल होणार आहे. परस्पर समन्वयाने उमेदवारांबाबत निर्णय न झाल्यास मतदान होऊ शकते, त्यासाठी भारिप-बमसं आणि भाजपकडूनही तयारी सुरू आहे.
भाजपकडून सर्वच जागांसाठी अर्ज दाखल करण्याची तयारी पक्षाने केली आहे, त्यानुसार उद्या, शुक्रवारी सर्वांचे अर्ज सादर होतील. पक्षाच्या सदस्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न आहे. - रमण जैन, गटनेते, जिल्हा परिषद.
भारिप-बमसंकडूनही इतर मागासवर्गासाठी राखीव जागेवर आष्टीकर यांच्यासोबत गीता अशोक राठोड यांचा अर्जही दाखल केला जाणार आहे, तसेच सर्वसाधारण जागेवरही इतर महिला सदस्यांचा अर्ज दाखल केला जाईल. - दामोदर जगताप, गटनेते, जिल्हा परिषद.