अकोला: अडीच तास विलंब होऊनही सभा सुरू करण्यात आली नसल्याने, संतप्त विरोधी गटाच्या काही सदस्यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत खुच्र्या, टेबल, ध्वनिक्षेपकांची फेकफाक व तोडफोड केली. त्यामध्ये एका महिला सदस्यास दुखापत झाली. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवार, १२ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली होती. परंतु, ३.३0 वाजल्यानंतरही जिल्हा परिषद अध्यक्षांसह पदाधिकारी, सभेचे सचिव सभागृहात आले नाही. अडीच तासांचा विलंब होऊनही सभा सुरू करण्यात आली नसल्याने, सभागृहात उपस्थित सदस्यांना बराच वेळ ताटकळत बसावे लागले. अखेर पर्यायी सभा अध्यक्षांची नेमणूक करून सभा सुरू करण्याची मागणी विरोधी गटाच्या सदस्यांनी केली. त्यानुषंगाने सदस्य चंद्रशेखर पांडे गुरूजी यांनी सुचविल्यानुसार सदस्य राजेश खोने यांना या सभेचे अध्यक्ष नेमण्यात आले व सभा सुरू करण्यात आली. त्यांनी सभेचे कामकाज सुरू केल्यानंतर, अडीच तासांचा विलंब झाल्यानंतरही पदाधिकारी सभागृहात आले नसल्याने, आणि सभा सुरू करण्यात आली नसल्याने, विरोधी गटाच्या सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या मुद्यावरून सभागृहात सुरू झालेल्या गोंधळात दोन सदस्यांनी सभागृहातील खुच्र्या, टेबल व ध्वनिक्षेपकांची फेकफाक व तोडफोड करून संताप व्यक्त केला. या गोंधळात एका सदस्याने सभागृहात भिरकावलेली खुर्ची सदस्य शोभा शेळके यांच्या हाताला लागल्याने, त्यांना दुखापत झाली. तसेच सदस्याने भिरकावलेला ध्वनिक्षेपकही त्यांच्या डोक्याजवळून गेला. सुदैवाने हा ध्वनिक्षेपक त्यांच्या डोक्याला लागला नाही. या गोंधळात विरोधकांनी नेमलेले अध्यक्ष खोने यांनी ही सभा तहकूब केली. सभागृहातील गोंधळ आणि तोडफोडीमुळे घाबरलेल्या अवस्थेत अधिकारी सभागृहाबाहेर निघून गेले. या घटनेनंतर दुपारी ४ वाजता अध्यक्ष शरद गवई यांच्यासह जिल्हा परिषदेचे इतर पदाधिकारी सभागृहात आले; मात्र विरोधी गटाचे सदस्य आणि अधिकारी सभागृहात आले नाही. सत्तापक्षाचे सदस्य सभागृहात उपस्थित होते; परंतु सभेचे सचिव व संबंधित अधिकारी सभागृहात उपस्थित नसल्याने, सभा सुरू होऊ शकली नाही. पदाधिकारी आणि सत्तापक्षाचे जिल्हा परिषद सदस्य रात्री ८.३0 वाजेपर्यंत सभागृहात बसून होते. परंतु जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर अधिकार्यांच्या अनुपस्थितीत सत्तापक्षाला ही सभा घेता आली नाही.
अकोला जिल्हा परिषदेच्या सभेत तोडफोड
By admin | Published: February 13, 2016 2:29 AM