अकोला : जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कार्यकारी अभियंता आणि सातही उपअभियंत्यांची पदे रिक्त असल्याने, जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या विभागाचा कारभार सध्या वाऱ्यावर सुरू असल्याचे वास्तव आहे.
जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता एस.एम. गायकवाड ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे रिक्त असलेल्या या पदावर नवीन कार्यकारी अभियंता म्हणून अद्याप नियुक्ती करण्यात आली नाही. तसेच जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत उपअभियंत्यांची सातही पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यकारी अभियंता आणि उपअभियंत्यांविना जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा कारभार सद्यस्थितीत सुरू आहे. कार्यकारी अभियंत्यासह उपअभियंत्यांची पदे रिक्त असल्याने, जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी पुरवठ्यासंदर्भात योजनांची अंमलबजावणी आणि करावयाच्या विविध उपाययोजनांच्या कामांवर परिणाम झाल्याचे वास्तव आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात रिक्त असलेल्या पदांवर अभियंत्यांची नियुक्ती केव्हा होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कार्यकारी अभियंतापदाचा प्रभार देण्याचा पेच!
जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंतापद रिक्त आहे. नियमानुसार या पदाचा प्रभार उपअभियंत्याकडे दिला जातो; मात्र उपअभियंत्यांची सातही पदे रिक्त असल्याने, कार्यकारी अभियंतापदाचा प्रभार देणार कोणाकडे, असा पेच जिल्हा परिषद प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.