- सदानंद सिरसाटअकोला : भारिप-बमसंने २५ सदस्यांच्या बळावर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली. आता सत्तेतील चार सभापतींची निवड करण्यासाठी सभागृहाच्या एकूण संख्येनुसार बहुमताचा आकडा गाठावा लागणार आहे. बहुमतासाठी दोन सदस्यांची गरज असली तरी त्यासाठी कोण सोबत येणार, याचा धांडोळा भारिप-बमसंला घ्यावा लागणार आहे. सभापतींच्या निवड सभेतही भाजप कोणता पवित्रा घेईल, यावरच सत्तेतील चार महत्त्वाची पदे कोणाच्या वाट्याला जातील, हे ठरणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवड सभेत भाजपने बहिर्गमन केल्याने सभागृहातील सदस्य संख्या कमी झाली. सभागृहात उपस्थित असलेल्या ४६ सदस्यांपैकी प्राप्त बहुमतातून अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. भाजपचे सदस्य सभागृहात उपस्थित असते तर ५३ पैकी सदस्य संख्येतून बहुमत म्हणजे, २७ चा आकडा गाठावा लागला असता; मात्र भाजपच्या सदस्यांचे बहिर्गमन तसेच महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्यास तयार नसल्याने ही संधी भारिप-बमसंला मिळाली. अशीच संधी चार सभापतींच्या निवड प्रक्रियेतही मिळेलच, असे नाही. सभापती निवड करण्याच्या सभेत कोणतेही समीकरण अस्तित्वात येऊ शकते. त्यावेळी भारिप-बमसंला कोंडीत पकडण्याचाही प्रयत्न होऊ शकतो. ही पदे भारिप-बमसंच्या हातातून सुटल्यास अध्यक्ष, उपाध्यक्ष पदावरच समाधान मानण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे येत्या काळात सभागृहात बहुमत ठेवण्यासाठी कोणाला जवळ केले जाते, हे येणारा काळच सांगणार आहे.
- चार सभापतींची लवकरच निवडजिल्हा परिषदेच्या सत्ता केंद्रामध्ये चार सभापतीही आहेत. जिल्हा परिषदेच्या दहा समित्यांची वाटणी अध्यक्ष, उपाध्यक्षांसह चार सभापतींमध्ये केली जाते. त्यामध्ये जल व्यवस्थापन व स्थायी समिती अध्यक्षांकडे दिली जाते. उपाध्यक्षांना द्यावयाच्या समित्यांचे वाटप सभेतच केले जाते. निवड झालेल्या चार सभापतींना समित्या दिल्या जातात. त्यामध्ये समाजकल्याण, महिला व बालकल्याण, अर्थ व शिक्षण, कृषी व पशुसंवर्धन, बांधकाम व आरोग्य या समित्यांचा समावेश आहे. या समित्यांचे सभापतीपद मिळण्यासाठीही अनेकांची इच्छा जागृत होणार आहे.
- सोबत कोण येणार...बहुमतासाठी भारिप-बमसंला दोन सदस्यांचीच गरज आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील कोणता पक्ष त्यांच्यासोबत येणार की भाजप सहभागी होणार, हे निवड प्रक्रियेतील मतदानाच्या वेळीच पुढे येणार आहे. भाजपने यापूर्वी भारिप-बमसंसोबत महिला व बालकल्याण सभापतीपद मिळविले होते, तर शिवसेनाही त्यावेळी सहभागी झाली होती. येत्या काळातील समीकरणातूनच सत्तेचे भवितव्य ठरणार आहे.