अकोला: जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या शेळीगट वाटप योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थींना शेळीगटांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी शेळीगटांच्या खरेदी प्रक्रियेवर लक्ष (वाॅच) ठेवण्यासाठी त्रीसदस्यीय समिती गठीत करण्यात येणार असून, यासंदर्भात बुधवार, ४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद पशुसंवर्धन समितीच्या सभेत निर्णय होणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.
जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत २०१९-२० या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थींना ७५ टक्के अनुदानावर शेळीगटांचे वाटप करण्याची योजना राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या आणि २५ टक्के लाभार्थी हिस्सा रक्कम जमा केलेल्या जिल्ह्यातील लाभार्थींना दहा शेळ्या व एक बोकूड अशा शेळीगटांचे वाटप जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत सुरू करण्यात आले होते. त्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी ‘लाॅकडाऊन’ लागू होण्यापूर्वी गत १३ मार्चपर्यंत ७०० लाभार्थींना शेळीगटांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर मात्र शेळीगटांच्या खरेदी प्रक्रियासंदर्भात तक्रारी करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर शेळीगटांचे वाटप थांबविण्यात आले होते. जिल्ह्यातील उर्वरित ५१० लाभार्थींना शेळीगटांचे वाटप लवकरच सुरू करण्यात येणार आहे. लाभार्थींना शेळीगटांचे वाटप करताना शेळीगटांची खरेदी प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने करण्याकरिता शेळीगटांच्या खरेदी प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांची त्रीसदस्यीय समिती गठित करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने ४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन समितीच्या सभेत निर्णय घेण्यात येणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.
शेळीगट वाटप योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थींना शेळीगटांचे वाटप करताना शेळीगटांच्या खरेदी प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी, यासाठी शेळीगटांच्या खरेदी प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी त्रीसदस्यीय समिती गठित करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषद पशुसंवर्धन समिती निर्णय घेणार आहे.
- ज्ञानेश्वर सुलताने
गटनेता, सत्तापक्ष, जिल्हा परिषद.