लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड शुक्रवार, १७ जानेवारी रोजी होणार असून, नवनिर्वाचित सदस्यांना विशेष सभेच्या नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. त्यानुषंगाने भारिप बहुजन महासंघ आणि काँग्रेसच्या जिल्हा परिषद गटनेत्यांची निवड सोमवारी करण्यात आली असून, जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना गती आली आहे.जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल ८ जानेवारी रोजी घोषित झाला असून, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड १७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा परिषद सभागृहात आयोजित विशेष सभेत करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने विशेष सभेच्या नोटीस जिल्ह्यातील सातही तहसीलदारांमार्फत जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित ५३ सदस्यांना सोमवारी पाठविण्यात आल्या आहेत. या पृष्ठभूमीवर भारिप-बमसं आणि काँग्रेस या दोन पक्षांच्यावतीने सोमवारी घेण्यात आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांच्या बैठकीत पक्षाच्या जिल्हा परिषद गटनेत्यांची निवड करण्यात आली आहे. गटनेते ठरल्यानंतर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या भारिप-बमसं आणि शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मिळून एकत्र आलेल्या महाविकास आघाडीच्या हालचालींना वेग आहे.भारिप जि.प. गटनेतेपदी ज्ञानेश्वर सुलताने!भारिप-बमसंच्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सदस्यांची बैठक सोमवारी घेण्यात आली. त्यामध्ये भारिप-बमसं जिल्हा परिषद गटनेतेपदी ज्ञानेश्वर सुलताने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, राजेंद्र पातोडे, अरुंधती शिरसाट, प्रभा शिरसाट, प्रमोद देंडवे, दीपक गवई, दामोदर जगताप, शोभा शेळके व डॉ. प्रसन्नजित गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत भारिप-बमसं सातही पंचायत समित्यांच्या गटनेत्यांचीही निवड करण्यात आली. त्यामध्ये अकोला पंचायत समिती गटनेतेपदी मंगला शिरसाट, तेल्हारा-संजय हिवराळे, अकोट-धीरज शिरसाट, बार्शीटाकळी-रामदास घाडगे, बाळापूर-अफसरखान इसा खान, पातूर-सुनीता टप्पे व मूर्तिजापूर पंचायत समिती गटनेतेपदी रवींद्र घुरडे यांची निवड करण्यात आली.काँग्रेस जि.प. गटनेतेपदी सुनील धाबेकर!काँग्रेसच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची बैठक सोमवारी स्वराज्य भवनातील काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात घेण्यात आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत काँग्रेसच्या जिल्हा परिषद गटनेतपदी सुनील धाबेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच बार्शीटाकळी पंचायत समिती गटनेतेपदी ऊर्मिला डाबेराव यांची निवड करण्यात आली.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुंबईला रवाना!जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या राजकारणात काँग्रेस पक्षाची भूमिका निश्चित करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंगळवार, १४ जानेवारी रोजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्यानुषंगाने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल सोमवारी सायंकाळी बैठकीसाठी मुंबईला रवाना झाले. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीसोबत राहायचे की भारिप-बमसंसोबत जायचे, यासंबंधीचा निर्णय काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत मंगळवारी होणार आहे.