लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हा परिषद निवडणुकीत सत्ता स्थापन करण्याएवढे कोणत्याही एका राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी, सर्वाधिक जागा जिंकलेल्या भारिप बहुजन महासंघाने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी चाचपणी सुरू केली आहे. सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेले सदस्यांचे संख्याबळ जुळविण्याकरिता समविचारी पक्षांसोबत हातमिळवणी करण्याची तयारी ‘भारिप’कडून सुरू करण्यात आली आहे.जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल ८ जानेवारी रोजी जाहीर झाला असून, त्यामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी असलेले २७ सदस्यांचे संख्याबळ कोणत्याही एका राजकीय पक्षाला मिळाले नाही. ५३ सदस्यीय जिल्हा परिषदेत सर्वाधिक २३ सदस्य भारिप बहुजन महासंघाचे निवडून आले असून, सत्ता स्थापनेसाठी २७ सदस्यांचा आकडा गाठण्यासाठी या पक्षाला चार सदस्यांची आवश्यकता आहे. त्यामध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेले दोन सदस्य भारिप-बमसंचेच असल्याने, सत्ता स्थापनेसाठी त्यांचा पाठिंबा मिळणार असल्याचा दावा या पक्षाकडून करण्यात येत आहे. दोन अपक्ष मिळून भारिप-बमसंचे सदस्य संख्याबळ २५ होत असले तरी, सत्ता स्थापनेसाठी आणखी दोन सदस्यांचे संख्याबळ लागणार आहे. त्यानुषंगाने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या संख्याबळाची जुळवाजुळव करण्याकरिता भारिप-बमसंकडून चाचपणी सुरू करण्यात आली आहे.त्यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या समविचारी पक्षांसोबत हातमिळवणी करण्याची तयारी सुरू करण्यात आली असून, यासंदर्भात समविचारी पक्षांच्या स्थानिक नेत्यांसोबत संपर्क साधण्याच्या हालचालीही भारिप-बमसंच्या स्थानिक नेत्यांकडून सुरू करण्यात आल्या आहेत.
भाजपच्या निर्णयाकडे लक्ष! जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारिप-बमसंला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप एकत्र आल्यास महाविकास आघाडीचे सदस्य संख्याबळ २७ होते. त्यानुषंगाने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, महाविकास आघाडीवर अद्याप शिक्कामोर्तब झाले नाही.
राज्यात सरकार स्थापनेसाठी एकत्र आलेल्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी झाली. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीत भाजप सहभागी होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
त्यानुषंगाने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या समीकरणात सात सदस्य असलेल्या भाजपकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे आता लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून भारिप-बमसंकडून सत्ता स्थापनेची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी समविचारी पक्षांसोबत हातमिळवणी करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.-डॉ. धैर्यवर्धन पुंडकर,प्रदेश प्रवक्ता, भारिप-बमसं.जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय अद्याप झाला नाही. पक्ष ठरवेल त्यानंतर या मुद्यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल.- तेजराव थोरात,जिल्हाध्यक्ष, भाजप.जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडी किंवा भारिप-बमसंसोबत जाण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. येत्या दोन-तीन दिवसांत यासंदर्भात निर्णय होणार आहे.-हिदायत पटेल,जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.