लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा प्रचार रविवार, ५ जानेवारी रोजी रात्री १० वाजता संपला असून, निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या गत सहा दिवसांपासून धडाडणाऱ्या प्रचारतोफा थंडावल्या आहेत. जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्याने, उमेदवारांनी आता गुपचूप प्रचारावर भर देत घरोघरी मतदारांच्या गाठीभेटी आणि बैठका सुरू केल्या आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मंगळवार, ७ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार असून, मतदान पथके सोमवारी मतदान केंद्रांवर रवाना होणार आहेत.जिल्हा परिषदेचे ५३ गट आणि जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर व मूर्तिजापूर या सात पंचायत समित्यांच्या १०६ गणांच्या निवडणुकीसाठी मंगळवार, ७ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी जाहीर प्रचाराचा कालावधी ५ जानेवारी रोजी रात्री १० वाजता संपला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे ५३ गट आणि पंचायत समित्यांच्या १०६ गणांतर्गत गावा-गावांमध्ये गत सहा दिवसांपासून सुरू असलेला उमेदवारांचा जाहीर निवडणूक प्रचार थांबला आहे. जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्याने निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या प्रचारार्थ वाहनांवर लावण्यात आलेले भोंगे काढण्यात आले असून, ध्वनिक्षेपकांचा वापर बंद करण्यात आला आहे. निवडणुकीचा जाहीर प्रचार संपल्याने उमेदवारांनी आता गुपचूप प्रचारावर भर देत, जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांमधील घरोघरी मतदारांच्या गाठीभेटी घेणे आणि बैठका घेणे सुरू केले आहे. दरम्यान, जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १ हजार १७ मतदान केंद्रांवर ७ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार असून, त्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांची पथके सोमवार, ६ जानेवारी रोजी मतदान केंद्रांवर रवाना होणार आहेत. जिल्हा प्रशासनामार्फत मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
नेत्यांनी घेतल्या प्रचार सभा!जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रचार कालावधीत जिल्ह्यात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जाहीर सभा घेतल्या. त्यामध्ये प्रामुख्याने भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वंचित बहुजन आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रचार सभा घेतल्या.
मतदानासाठी सुटी जाहीर!जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी (७ जानेवारी रोजी) जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसेच ६ व ७ जानेवारी रोजी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांनाही सुटी जाहीर करण्यात आली आहे.