Akola ZP Election : सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 10:40 AM2020-01-13T10:40:54+5:302020-01-13T10:41:00+5:30
सत्ता स्थापनेच्या राजकारणात भारिपसोबत जायचे की महाविकास आघाडीसोबत राहायचे, यासंबंधीचा निर्णय मंगळवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मुंबईत बोलाविलेल्या बैठकीत होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला असून, सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या भारिप बहुजन महासंघाने सत्ता स्थापनेसाठी समविचारी पक्षांसोबत हातमिळवणीची तयारी सुरू केली आहे. त्यानुषंगाने भारिप-बमसंच्या जिल्हा परिषद सदस्यांची सोमवारी बैठक बोलविण्यात आली आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मिळून एकत्र आलेल्या महाविकास आघाडीकडूनही जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत; मात्र सत्ता स्थापनेच्या राजकारणात भारिपसोबत जायचे की महाविकास आघाडीसोबत राहायचे, यासंबंधीचा निर्णय मंगळवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मुंबईत बोलाविलेल्या बैठकीत होणार आहे.
जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल ८ जानेवारी रोजी जाहीर झाला असून, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड १७ जानेवारी रोजी होणार आहे. ५३ सदस्यीय जिल्हा परिषदेत भारिप-बमसं-२३, शिवसेना-१३, भाजप-७, काँग्रेस-४, राष्ट्रवादी काँग्रेस-३ व अपक्ष-३ असे सदस्यांचे संख्याबळ आहे. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी २७ सदस्यांचे संख्याबळ आवश्यक असून, त्यानुषंगाने सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या भारिप-बमसंकडून दोन अपक्ष सदस्यांसह समविचारी पक्षांसोबत हातमिळवणीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले असून, सत्ता स्थापनेची तयारी सुरू केली आहे. त्यानुषंगाने सोमवार, १३ जानेवारी रोजी भारिप-बमसंच्या जिल्हा परिषद सदस्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मिळून महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यादृष्टीने महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे; परंतु जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या राजकारणात भारिप-बमसंसोबत जायचे की महाविकास आघाडीसोबत राहायचे, यासंदर्भात काँग्रेसचा अंतिम निर्णय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी मुंबईत बोलाविलेल्या बैठकीत होणार आहे.
काँग्रेस जि.प., पं.स. सदस्यांची आज बैठक!
काँग्रेसच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची बैठक सोमवारी अकोल्यातील स्वराज्य भवनातील काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात घेण्यात येणार आहे. या बैठकीनंतर पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठकदेखील घेण्यात येणार आहे. या बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये सत्ता स्थापनेच्या समीकरणांवर चर्चा करण्यात येणार आहे, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांनी सांगितले.
भारिपच्या जि.प., पं.स. गटनेत्यांची आज निवड!
भारिप बहुजन महासंघाच्या जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक सोमवारी सकाळी ९ वाजता अकोल्यातील एका हॉटेलमध्ये बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत पक्षाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या गटनेत्यांची निवड करण्यात आली आहे, असे भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी एकत्र आली आहे. महाविकास आघाडी भारिपसोबत जाणार नाही. जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
-आ. नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख, शिवसेना.
जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुषंगाने महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये भाजपला सोबत घेण्यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठांसोबत चर्चा करणार आहे.
-संग्राम गावंडे,
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.
जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांचा निर्णय झाला आहे; परंतु यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी मुंबईत बैठक बोलावली असून, या बैठकीत जिल्हा परिषदेत काँग्रेसने भारिपसोबत जायचे की महाविकास आघाडीसोबत राहायचे, यासंबंधीचा अंतिम निर्णय होणार आहे.
- हिदायत पटेल,
जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.