अकोला: ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार चालविणाऱ्या ग्रामसेवकांना त्यांच्या कामाबाबत किती माहिती आहे, याची चाचपणी रविवारी लेखी परीक्षेतून घेण्यात आली. जिल्हा परिषदेत विशेष शिबिरासाठी ग्रामसेवकांना बोलावून त्यांच्या हाती प्रश्नपत्रिका देण्यात आल्याने दोघांची प्रकृती ऐनवेळी बिघडली, तर दोन ग्रामसेवकांनी उपस्थित राहणेच टाळले. त्यांना अनधिकृत गैरहजर असल्याची नोटीस मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी बजावली.ग्रामपंचायतींची कामे, विकास योजना यासंदर्भातील माहितीनुसार तसेच कामकाजाबाबत सुधारणा करण्यासाठी रविवारी जिल्हा परिषदेत शिबिर होत आहे. त्यासाठी सातही तालुक्यांतील ठरावीक ग्रामसेवकांना उपस्थित राहण्याचे शनिवारी बजावण्यात आले. त्यामध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरीचे ए. आर. खोडके, वीरवाडा- एस. एम. हातोलकर, सांगवी- मंगेश बुंदे, वडगाव- बी. पी. सोळंके, विराहित- एस. यू. अंभोरे, गोरेगाव- एस. आर. अवधूत, हातगाव- पी. आर. गुजर. पातूर पंचायत समितीमधील आर.के. बोचरे, तेल्हारा तालुक्यातील रायखेडचे जी. आर. टिकार, हिवरखेड- बी. एस. गरकल, खंडाळा- व्ही.व्ही. चव्हाण, वस्तापूर- एस.जे. शेळके, अकोत तालुक्यातील अंबोडा-सी. एच. डाबेराव, रौंदळा-आर.आर. गंडाळे, गुल्लरघाट-एस.बी. काकड, रेल-एम.एम. भांबुरकर, देवरी-शैलजा पाटील, जऊळका-व्ही.एस. वायाळ, लोतखेड-एम.एम. रखाते, खिरकुंड-एस.आर. ठोंबरे. बाळापूर तालुक्यातील पारसचे जी.एस. डोंगरे, कोळासा-जी.एस. अंधारे, मोरगाव सादिजन-जी.एस. वाडेकर, हाता-कांचन वानखडे, अंदुरा-प्रशांत सोळंके, भरतपूर-महल्ले, उरळ-वाडेकर, चिंचोली गणू-सुपाजी अंभोरे, लोहारा-भारसाकळे, निंबा- शीतल मोरे. बार्शीटाकळी तालुक्यातील देवदरीचे महादेव भारसाकळे, शिंदखेड-यू.डी. तेलगोटे. अकोला पंचायत समितीमधील येवता ग्रामपंचायतचे बिडकर यांना बोलावण्यात आले. छत्रपती शाहू महाराज सभागृहात उपस्थित ग्रामसेवकांना प्रश्नपत्रिका देण्यात आली. त्याची उत्तरे लेखी स्वरूपात देण्याचे सांगण्यात आले.
दोघांची प्रकृती स्थिरयावेळी चिंचोली गणूचे ग्रामसेवक सुपाजी अंभोरे, हाताच्या ग्रामसेविका कांचन वानखडे यांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असून, कुठलाही धोका नसल्याचे स्पष्ट केले; मात्र त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप भंडारे यांनी रुग्णालयात जाऊन दोन्ही ग्रामसेवकांची भेट घेतली.
गैरहजर दोघांना नोटीससोबतच शिबिरात उपस्थित राहण्याचे बजावल्यानंतरही दोन ग्रामसेवक गैरहजर होते. त्यामध्ये तेल्हारामधील जी.आर. टिकार, बाळापूरमधील शीतल मोरे आहेत. या दोन्ही ग्रामसेवकांना अनधिकृत गैरहजर असल्याच्या कारणावरून विनावेतन असाधारण रजा का मंजूर करू नये, तसेच कारवाई का करू नये, अशी नोटीस बजावण्यात आली. त्याचे उत्तर तीन दिवसांत समक्ष सादर करण्याचे म्हटले आहे.
फोन उचलत नसल्याने दिली संधी!ग्रामसेवक ग्रामस्थांचे फोन शक्यतोवर उचलत नाहीत. त्यामुळे फोन न उचलणे, समोरच्याला आवश्यक ती सेवा न मिळाल्याने किती त्रास होऊ शकतो, याची जाणीव करून देण्यासाठी माहिती नसलेल्या विषयाबाबत मित्रांना फोनवरून मार्गदर्शन करण्याचीही संधी देण्यात आली.