अकोला : आंतरजिल्हा बदलीमध्ये बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी जिल्ह्यातील एका शिक्षकाला कार्यमुक्त करण्यात आल्यानंतर कार्यमुक्त करण्याचा आदेश रद्द करीत, त्याच शिक्षकाला पूर्वीच्याच शाळेत ८ आॅक्टोबर रोजी रुजू करून घेण्यात आले. त्यामुळे अकोला जिल्हा परिषदेच्या अजब कारभाराचा प्रकार समोर आला आहे.शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत गत जुलैमध्ये आॅनलाइन राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या १९ प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदली करण्यात आली. त्यानुसार आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत संबंधित शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये जालना जिल्हा परिषद अंतर्गत बदली झालेल्या जिल्ह्यातील कासली बु. येथील शाळेतील एका शिक्षकालाही कार्यमुक्त करण्यात आले; परंतु पद रिक्त नसल्याने संबंधित शिक्षकास कार्यमुक्त न करण्याचे जालना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे पत्र अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्राप्त झाले. तसेच जालना येथे जाण्यास तयार नसल्याचे संबंधित शिक्षकाचेही पत्र जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाले. त्यामुळे आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी जिल्ह्यातील संबंधित एका शिक्षकास कार्यमुक्त करण्याचा आदेश रद्द करून, पुन्हा कासली बु. येथील शाळेत रूजू करून घेण्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी ७ आॅक्टोबर रोजी त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत ८ आॅक्टोबर रोजी संबंधित शिक्षकास पूर्वीच्या शाळेत (ठिकाणी) रूजू करून घेण्यात आले. आंतरजिल्हा बदली झाल्याने कार्यमुक्त केलेल्या शिक्षकाला पुन्हा पूर्वीच्याच ठिकाणी रूजू करुन घेण्यात आल्याने, जिल्हा परिषदेतील अजब कारभार समोर आला आहे.आंतरजिल्हा बदलीमध्ये जालना येथे बदली झालेल्या जिल्ह्यातील एका शिक्षकास कार्यमुक्त करण्यात येऊ नये, असे पत्र जालना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडून प्राप्त झाले, तसेच जालना येथे जाण्यास तयार नसल्याचे पत्र संबंधित शिक्षकाकडून प्राप्त झाले. त्यामुळे जालना येथे बदली झालेल्या जिल्ह्यातील कासली बु. येथील एका शिक्षकास पूर्वीच्याच ठिकाणी रूजू करुन घेण्याचा आदेश दिला.-सौरभ कटीयारमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला.