मुख्य नाल्याचे बांधकाम सुरू
अकोला : जुने शहरातील बाळापूर रोडलगत असलेल्या मुख्य मार्गाचे निर्माणकार्य केले जात आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या नाल्याचे काम पूर्ण झाल्यास नागरिकांसाठी सोईचे होईल, मात्र या नाल्याचे काम पूर्ण न झाल्यास अनेक भागात नाल्यातील पाणी रस्त्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रमाणपत्रासाठी दिव्यांग बांधवांना हेलपाटे
अकोला : सर्वोपचार रुग्णालयातील दिव्यांग कक्ष पुन्हा सुरू झाले आहेत. या ठिकाणी डॉक्टरांचीही नियुक्ती करण्यात आली आहे, मात्र कक्षात डॉक्टरांची पूर्णवेळ उपस्थिती राहत नसल्याने दिव्यांग बांधवांची डोकेदुखी वाढली आहे. येथील काही कर्मचारी दिव्यांगांसोबत अरेरावीची भाषा बोलताना दिसून येतात. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
पेट्रोल महाग, सायकलिंगला पसंती
अकोला : जिल्ह्यात पेट्रोलच्या किमती शंभरी पार गेल्याने अनेकांनी वाहनांचा उपयोग कमी केल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याऐवजी आता लोक सायकलला पसंती देत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सायकलला चांगले दिवस आल्याचे दिसून येत आहे.
रुग्णांना डासांचा धोका
अकाेला: सर्वोपचार रुग्णालयातील कोविड वाॅर्डसह बाल रुग्णांच्या वॉर्ड परिसरात झुडपांचे प्रमाण वाढले आहे. तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकडून खाद्यपदार्थही याच परिसरात टाकण्यात येत असल्याने परिसरात अस्वच्छता वाढली आहे. त्यामुळे येथे डासांसह माश्यांचाही प्रादुर्भाव वाढला असून, त्याचा रुग्णांना धोका वाढला आहे.