अकोला : कोरोना विषाणूने संपूर्ण देशात धुमाकूळ घातला असून, कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामाला लागली असून, कोरोना योद्धा म्हणून डॉक्टर, परिचारिका अहोरात्र काम करत आहेत. मूर्तिजापूर तालुक्यातील हिवरा कोरडे येथील शेतकऱ्याची २८ वर्षीय मुलगी मुंबई येथील बीकेसी जम्बो कोविड सेंटरमध्ये गत तीन महिन्यांपासून कोरोना रुग्णांची सेवा करत आहे. गायत्री चरणदास डोंगरे असे या शेतकरी कन्येचे नाव असून, तब्बल १००० खाटांच्या या कोविड सेंटरमध्ये ती मुख्य परिचारिका म्हणून रुग्णसेवा करत आहे.गायत्री ही मुंबई येथील एका खासगी रुग्णालयात नोकरीला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मुंबईत केबीसी जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले. गायत्रीने खासगी इस्पितळातील नोकरी सोडून, २८ मेपासून जम्बो कोविड सेंटरमध्ये रुग्णसेवा प्रारंभ केली. तब्बल २०० परिचारिका तिच्या नेतृत्वाखाली या सेंटरमध्ये कोरोना रुग्णांची शुश्रूषा करत आहेत. गायत्री ही गत आठ महिन्यांपासून गावाकडे परतलेली नाही. तिच्या आईची प्रकृती ठीक नसल्यामुळे या महिन्यात ती गावाकडे परत येणार होती; परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे तिला आपला बेत रद्द करावा लागला. गत काही महिन्यांपासून दररोज सहा ते आठ तास पीपीई किटमध्ये राहून रुग्णसेवा करावी लागत आहे. गत काही महिन्यांपासून कोणतीही सुटी न घेता आम्ही कर्तव्यावर आहोत. प्रदीर्घ काळ कर्तव्यावर मानसिक ताण, संसर्ग होण्याची भीती सतत लागून असते. सुदैवाने आतापर्यंत आमच्यापैकी केवळ दोघींना कोरोनाची लागण झाल्याचे गायत्री सांगते.
रुग्णसेवेला प्राधान्यगत आठ महिन्यांपासून घरापासून लांब असलेल्या गायत्रीबाबत तिच्या आई-वडिलांना सतत काळजी वाटते. त्यांना भेटण्यासाठी ती या महिन्यात येणार होती; परंतु ते शक्य होऊ शकले नाही. मला आई-वडिलांची खूप आठवण येते; परंतु सध्या रुग्णांच्या सेवेला प्राधान्य असल्याचे गायत्री सांगते.