अकोला : चेन्नई येथे २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या १९ व्या ‘आंतरराष्ट्रीय एसआयपी अॅबॅकस अॅण्ड मेंटल अॅरिथमॅटिक’ स्पर्धेत अकोल्यातील देवश्री संतोष शेळके हिने भारतातून तिसरा क्रमांक पटकावला. या यशाचे कौतुक करीत दिव्यांग आर्ट गॅलरीतर्फे तिचा सत्कार करण्यात आला.चेन्नई येथे झालेल्या १९ व्या आंतरराष्ट्रीय अॅबॅकस स्पर्धेत ११ देशांसह भारतातील २३ राज्यांतील विविध स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये अकोल्यातील देवश्री शेळके या चिमुकलीने उत्कृष्ट कामगिरी बजावत देशातून तिसरा क्रमांक पटकावला. यापूर्वी तिने विभागीय अॅबॅकस स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करीत दुसरे स्थान पटकावले होते. तल्लख बुद्धी असलेली देवश्री संगीत कलेतही निपून असून, ती प्रा. विशाल कोरडे यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवत आहे. वयाच्या पाचव्या वर्षी तिने दृष्टी गणेशा या संगीत कार्यक्रमात सहभाग नोंदविला होता. तिने आपल्या यशाचे श्रेय आई सुवर्णा शेळके, वडील संतोष शेळके, अॅबॅकसचे शिक्षक राधा बजाज, संगीत शिक्षक प्रा. विशाल कोरडे, आजोबा विजय कोरडे, आजी माधुरी कोरडे, सुधीर शेळके, अवनी शेळके, डॉ. मयूरी जाधव व श्रीकांत कोरडे यांना दिले. यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.