अकोला : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्य मंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सोमवारी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयास सकाळी ११.३० वाजता भेट दिली. यावेळी त्यांनी आरोग्य जनता दरबार रुग्णालयाच्या बाह्योपचार विभाग अर्थात ‘ओपीडी’मध्येच घेतला. ओपीडीमध्ये विभागनिहाय आढावा घेतानाच त्यांनी रुग्णांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या व तक्रारी ऐकून घेतल्या.येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णसंख्या मोठी असली, तरी त्या तुलनेत आरोग्य सुविधांची येथे वानवा असल्याच्या तक्रारी आहेत. रुग्णांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी महिन्यातून दोन वेळा आरोग्य जनता दरबार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानूसार पहिला आरोग्य जनता दरबार ८ जानेवारी रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरविण्यात आला होता. याच उपक्रमाचा भाग म्हणून सोमवार, २२ जानेवारी रोजी पालकमंत्री सकाळी साडे अकरा वाजता सर्वोपचार रुग्णालयात धडकले. यावेळी ते थेट बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी)मध्ये गेले. तेथे विविध विभागांच्या ओपीडीमध्ये कसे काम-काज चालले आहे, याची माहिती घेतली. एवढेच नव्हे, तर यावेळी त्यांनी रुग्णांसोबत संवाद साधून त्यांच्या तक्रारी, समस्या ऐकून घेतल्या. रुग्णांनी यावेळी कोणत्याही प्रकारच्या लेखी तक्रारी दिल्या नसल्या, तरी पालकमंत्र्यांशी संवाद साधताना त्यांना अडचणी सांगितल्या.यावेळी अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, उप अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख यांच्यासह डॉक्टर मंडळी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयास भेट
विभागनिहाय ओपीडींची पाहणी केल्यानंतर पालमंत्र्यांनी सर्वोपचार रुग्णालय परिसरातच असलेल्या जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयास भेट देऊन आढावा घेतला. यावेळी त्यांनी कार्यालयातील कर्मचाºयांचीही माहिती घेतली. या भेटी दरम्यान जिल्हा शल्य चिकत्सक पुणे येथे गेलेले असल्यामुळे अनुपस्थित होते.