अकोला: कधीकाळी देशातील सरकी, ढेपच्या बाजारपेठेवर अधिराज्य गाजविणाऱ्या अकोल्याची पकड आता सैल होत आहे. अमरावती आणि मराठवाड्याने सरकी, ढेपची बाजारपेठ अधिक विकसित केली असून, अकोल्यापेक्षा शंभर रुपयांच्या कमी दराने बाजारपेठेत सरकी, ढेप मिळत आहे. त्यामुळे आता पशुपालकांनी अकोल्याकडे पाठ फिरविली आहे.सरकी आणि ढेपचे भाव सध्या तेजीत असले तरी अकोल्यातील सरकी, ढेपला आता पहिल्यासारखी मागणी नाही. एकेकाळी अकोल्यातून दररोज ५० ट्रक सरकी, ढेपचा माल देशभरात जायचा, त्या तुलनेत आता केवळ १० ते १२ ट्रक मालास मागणी आहे. अकोल्यातील सरकी, ढेप बाजारपेठेची जागा अमरावती आणि मराठवाड्याने घेतली आहे. मार्च महिन्यातील ९ तारखेला अकोल्यातील सरकी, ढेपचे भाव २०५० प्रतिक्विंटल असताना अमरावती आणि मराठवाड्याच्या सरकी, ढेपचे भाव १९५० होते. हा फरक आता कायमचा राहत असल्याने पशुखाद्य खरेदीदार अकोल्यात येण्याऐवजी अमरावती आणि मराठवाड्याकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. अकोल्यातील सरकी, ढेप निर्मात्यांना याबाबत विचारणा केली असता, अकोल्यातील ढेपचा दर्जा अजूनही इतर सरकी, ढेपच्या तुलनेत श्रेष्ठ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विदर्भात पूर्वी कापसाचा पेरा अधिक असल्याने कापूस, सरकी तेल आणि सरकी ढेपचे उद्योगही जास्त होते. त्यातल्या त्यात अकोल्यात हे उद्योग अधिक होते. आॅलमिल्स आणि ढेप मिल्सची अकोल्यातील संख्या मोठी होती. ५५ सरकी ढेप मिल्सपैकी आता अर्ध्यादेखील अकोल्यात राहिल्या नाहीत. देशातील विविध प्रदेशात अकोल्यातील सरकी, ढेप पशुखाद्य म्हणून प्रसिद्ध होती. दुधाळ जनावरांसाठी सरकी, ढेप लाभदायक असल्याने अकोल्यातील ढेपला चांगली मागणी असते; मात्र ही मागणी आत कमी झाल्याने अकोल्यातील सरकी, ढेप निर्मिती करणारे अनेक उद्योजक अडचणीत सापडले आहेत.