अकोला - सूर्य पुन्हा आग ओकत असून बुधवार, २४ एप्रिल रोजी अकोल्याचे कमाल तापमान पुन्हा ४५.१ अंशावर पोहोचल्याने दुपारी रस्त्यावर संचारबंदीसदृश स्थिती निर्माण झाली. दरम्यान, २५ एप्रिल रोजी तुरळक तर २६ ते २८ एप्रिलपर्यंत विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला.
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कमाल तापमानात वाढ झाली असून, देशात सर्वाधिक ४४.० अंश कमाल तापमानाची नोंद मागच्या पंधरवड्यात अकोल्यातच झाली. त्यानंतर बुधवार, २४ एप्रिल रोजी अकोल्याचे किमान तापमान ४५.१ अंशावर पोहोचले असून, या उन्हाने नागरिकांना घराबाहेर निघणे कठीण केले. मागील आठ दिवसांपासून वातावरणातही बदल झाला असून, रात्री १२ वाजतानंतर गारवा तर दिवसा प्रचंड तापमान या विषम हवामानामुळे सर्दी, खोकला व तापेच्या रुग्णांत वाढ झाली आहे.